प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत
By सुदाम देशमुख | Updated: December 27, 2024 05:56 IST2024-12-27T05:56:22+5:302024-12-27T05:56:22+5:30
स्मरण: पंतप्रधान असताना ८ फेब्रुवारी २००८ रोजी केला होता जिल्ह्याचा दौरा

प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत
अहिल्यानगर: पंतप्रधान असताना मनमोहनसिंग यांनी ८ फेब्रुवारी २००८ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे एका समारंभाला हजेरी लावली होती. याच समारंभात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचे सूतोवाच केले होते. पुढे केंद्र सरकारने या कर्जमाफीची घोषणा केली.
प्रवरानगर येथे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मनमोहनसिंग आले होते. या समारंभाला तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार बाळासाहेब विखे पाटील उपस्थित होते.
‘देश के सबसे मेहनती और आधुनिक किसान’ अशा शब्दांत त्यांनी त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गौरव केला होता. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहे. सरकारने साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चालू पंचवार्षिक योजनेत तब्बल ३५ हजार कोटींच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाची मोठी समस्या असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले होते. विठ्ठलराव विखे पाटील हे ‘कर्मयोगी’ आहेत असे त्यांनी विखे पाटलांबाबत गौरवोद्गारही काढले होते.
मनमोहनसिंग यांनी जे सूतोवाच केले त्यासंदर्भातील वृत्त ९ फेब्रुवारी २००८ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २९ फेब्रुवारी २००८ रोजी मनमोहनसिंग सरकारचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शेतकऱ्यांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मनमोहनसिंग यांच्या निधनानंतर जनतेला त्यांच्या प्रवरानगरमधील घोषणेची व या निर्णयाची प्रकर्षाने आठवण झाली.