मंगलमूर्ती मोरयाचा गजर
By Admin | Updated: September 12, 2016 23:12 IST2016-09-12T23:10:47+5:302016-09-12T23:12:13+5:30
अहमदनगर : शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून, धार्मिक सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धांमुळे उत्सवाची रंगत वाढली आहे़

मंगलमूर्ती मोरयाचा गजर
अहमदनगर : शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचला असून, धार्मिक सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धांमुळे उत्सवाची रंगत वाढली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, विविध मंडळांनी यंदा बनविलेले नावीण्यपूर्ण देखावे आकर्षण ठरले आहेत़
शहरातील सर्व सार्वजनिक मंडळाने रविवारी देखावे खुले केले़ दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, टिळक रोड, नवी पेठ, कापड बाजार, गांधी मैदान, माळीवाडा, माणिक चौक आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून नागरिक येत आहेत़ या उत्सवामुळे शहरातील रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आले आहे.
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांबरोबरच मंडळाचे कार्यकर्तेही खबरदारी घेत आहेत. देखावा पाहण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी उसळणार नाही, टप्प्याटप्प्याने लोकांना देखावा पाहता येईल. यासाठी कार्यकर्त्यांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.
नेप्तीनाका चौकातील नवग्रह मित्रमंडळाने महिला अत्याचाराबाबतची शिवकालीन न्याय व आजची न्यायदान व्यवस्था असा तुलनात्मक देखावा सादर केला आहे़ खिस्त गल्ली येथील वर्धमान तरुण मंडळाने भव्य गुहेतील माता वैष्णव देवी दरबार हा देखावा सादर केला आहे़ माळीवाडा येथील नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने ‘श्रीकृष्ण रासलीला’, पटवर्धन चौक येथील मंडळाच्यावतीने ‘स्वप्न स्वराज्य ते सुराज्य’ माळीवाडा येथील नवयुग मंडळाच्यावतीने ‘जिजाऊ व शिवबाचे हे का ते स्वराज्य’ असा प्रबोधनात्मक देखावा सादर करण्यात आला आहे़ रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाले़ यासह विविध सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक विषयांवर देखावे तयार करण्यात आले आहेत़
(प्रतिनिधी)