जागा नसून मांडला मंडईचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:31+5:302021-02-06T04:36:31+5:30
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार उघड झाला. मागील वर्षी खासदार सुळे यांनी या जागेचे भूमिपूजन केले होते. शहरातील ...

जागा नसून मांडला मंडईचा घाट
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार उघड झाला. मागील वर्षी खासदार सुळे यांनी या जागेचे भूमिपूजन केले होते. शहरातील मुख्य नेहरू भाजी मंडईच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यातून काही प्रभागांमध्ये स्वतंत्ररित्या मंडई विकसित करण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. त्याचाच भाग म्हणून हे भूमिपूजन पार पडले होते. मात्र सभेमध्ये या कामी अखर्चित राहिलेल्या निधीचा प्रश्न चर्चेला आल्यानंतर ही बाब उघड झाली. मोकळ्या भूखंडावरील जागेवर मंडई उभारता येत नाही. त्यामुळे तब्बल तीन वेळा नगररचना विभागाकडे त्यासाठी प्रस्ताव पाठवूनही तो फेटाळण्यात आल्याचे समोर आले.
पालिकेच्या भुयारी गटार योजनेकरिता सरकारने सन २०१६-१७मध्ये अवघ्या एक लाख ३० हजार रुपयांना १२ एकर जागा देऊ केली होती. मात्र त्यासंबंधीचा कागद पालिकेतून गहाळ झाल्याचा आरोप नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केला. गोंधवणी शिरसगाव या रस्त्याकरिता एक कोटी १० लाख रुपये मंजूर आहेत. मात्र गेली अनेक वर्षे हा रस्ता मार्गी लागला नाही, असे अंजूम शेख म्हणाले. नगरसेवक संजय फंड म्हणाले, गेवराई व घोटी या महामार्गाच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील संगमनेर व नेवासे रस्त्यावरील दुकानदारांचा रोजगार जाण्याची भीती आहे. त्यामुळे शहरातील प्रस्तावित रिंग रोडचे काम हाती घेतल्यास त्यातून मार्ग निघेल. निवृत्त स्वातंत्र्य सैनिकांनी नगराध्यक्षांकडे स्मारक उभारणीसाठी जागा मागितली आहे. मात्र त्यांना ती देण्याऐवजी त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष ससाणे यांनी केला. त्यावरून नगराध्यक्षा आदिक यांनी सदर जागा मुलांना खेळण्यासाठी आरक्षित असून सैनिकांसाठी स्वतंत्ररित्या मोठी जागा देण्याची इच्छा व्यक्त केली. सैनिकांचा आपल्याला आदर असल्याचे त्या म्हणाल्या.
नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनावरून टीका केली. ठेकेदाराची सर्व बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक किरण लुणिया, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, भारती कांबळे, राजेश अलघ यांनी चर्चेत भाग घेतला.
---------
१५ कोटी रुपये थकले
शहरातील साडेचार हजार नागरिकांकडे विविध करापोटी १५ कोटी रुपये थकले आहेत. ते तातडीने वसूल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------