हरिश्चंद्रगड, रतनवाडी येथील महाशिवरात्रीचा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:00+5:302021-03-10T04:22:00+5:30
ग्रामपंचायतींनी हा निर्णय घेतला असून वन्यजीव विभागानेही अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शविला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीसाठी रतनवाडी येथील पांडवकालीन हेमाडपंथी अमृतेश्वराच्या ...

हरिश्चंद्रगड, रतनवाडी येथील महाशिवरात्रीचा यात्रोत्सव रद्द
ग्रामपंचायतींनी हा निर्णय घेतला असून वन्यजीव विभागानेही अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शविला आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीसाठी रतनवाडी येथील पांडवकालीन हेमाडपंथी अमृतेश्वराच्या मंदिरात हजारो भाविक येत असतात. या मंदिरात असणाऱ्या पिंडीचे दर्शन घेत पर्यटनाचा आनंदही लुटत असतात.
हरिश्चंद्रगडावर असलेल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असणाऱ्या भाविकांबरोबर पर्यटकही दुर्ग भ्रमंती करतात. गडावर जाण्यासाठी भल्या पहाटेपासून येथे लोकांची रिघ लागलेली असते. गडावरील तारामती, रोहिदास शिखर आणि कोकणकडा या ठिकाणी हजारो भाविक यादिवशी आवर्जून भेट देतात. येथील निसर्गाचा आविष्कार डोळ्यात साठवत असतात.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आदिवासी पट्ट्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या दोन्ही मुख्य यात्रा ग्रामपंचायत आणि स्थानिक समितीने रद्द केल्या आहेत. ही दोन्हीही ठिकाणे वन्यजीव विभागाच्या हद्दीत असल्याने या विभागानेही या ग्रामपंचायतींच्या निर्णयाला आपलीही सहमती दर्शवली आहे.
.........
रतनवाडी आणि हरिश्चंद्रगडावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविक वेगवेगळ्या ठिकाणांवरून येत आवर्जून भेट देतात. या दिवशी येथील स्थानिक लोक आपली दुकाने थाटत असतात. यातून रोजगार निर्मिती करत असतात. मागील तीन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पर्यटकांचा ओघ सुरू झाला होता. परंतु, सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे यावर्षी महाशिवरात्रीचा यात्रोत्सव बंद करण्यात आला असून कोणी आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव संमत झाला आहे.
- संपत झडे, सरपंच, ग्रामपंचायत रतनवाडी