चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:56 IST2025-05-06T05:56:39+5:302025-05-06T05:56:50+5:30
अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे.

चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
- अशोक निमोणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड (जि. अहिल्यानगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथे पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचेल, असा चौंडी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या सातशे कोटींच्या आराखड्यावर चोंडी येथे आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास शिल्पसृष्टीतून उलगडणार आहे. अहिल्यादेवींचे माहेरचे नववे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चोंडीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा यादृष्टीने ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला. १६ एप्रिलला मुंबईत विधान भवनात सभापती शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी हा आराखडा सादर केला होता.
७० एकर जमिनीवर स्मारक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा १०८ फूट उंचीचा पुतळा सीना नदीपात्रात नैसर्गिक बेटावर उभारला जाईल. त्यामध्ये आठ महत्त्वाचे टप्पे असलेले समूह शिल्प पुतळ्यालगत उभारले जाईल. नदीपात्रात नैसर्गिक बेट आहे. या बेटावरील नियोजित पुतळ्यासमोरील नदीपात्रालगतच्या ७० एकर जमिनीवर स्मारक होणार आहे.
अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेत, चोंडीमध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण स्नेही रचना आणि पारंपरिक शैली यांचा समन्वय साधून एक मॉडेल गाव उभे करण्याचा मानस आहे.
प्रा. राम शिंदे, सभापती, विधान परिषद