भगवान गडावर मेळावा न घेण्याबाबत महंत ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:55 IST2017-09-12T15:51:18+5:302017-09-12T15:55:00+5:30
महंतांनी यावर्षीही गडावर राजकीय मेळावा न घेण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याने मुंडे यांच्या दसरामेळाव्यावरून पुन्हा एकदा रणकंदन पेटणार असल्याचे दिसत आहे़

भगवान गडावर मेळावा न घेण्याबाबत महंत ठाम
अहमदनगर: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून यंदा भगवान गडावरच दसरा मेळावा घेण्याचे सांगितले जात असताना गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गडावर राजकीय, सामाजिक मेळावे अथवा कोणत्याही उद्घाटनाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे़
महंतांनी यावर्षीही गडावर राजकीय मेळावा न घेण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याने मुंडे यांच्या दसरामेळाव्यावरून पुन्हा एकदा रणकंदन पेटणार असल्याचे दिसत आहे़ मुुंडे समर्थक मात्र गडाच्या पायथ्याशी नव्हेत गडावरच मेळावा घेण्याचे सांगत असून, याबाबत औरंगाबाद येथे दसरा मेळावा कृती समितीची नुकतीच बैठक झाली़ या बैठकीत भगवान गडावरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला़
शास्त्री यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० सप्टेंबर रोजी दसरानिमित्त भगवानगड येथे पारंपरिक पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे़ श्री क्षेत्र भगवान ट्रस्टद्वारे यावर्षी ३० सप्टेंबर रोजी कोणत्याही राजकीय व्यक्ती, व्हीआयपी यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही़ तसेच कुठल्याही सार्वजनिकम सभेचे अथवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले नाही़ भगवानगड ही स्वयत्त संस्था आहे़ या ठिकाणी कुठल्याही उद्घाटनाला परवानगी देऊ नये़ अशा कार्यक्रमांना परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ मागील वर्षी प्रशासनाने मेळावा व सभा घेण्यास परवानगी नाकारली होती़असे या निवेदनात म्हटले आहे़ या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत़
गडावर मेळावा घेण्याचा अट्टहास का?
दसरा मेळाव्यासाठी मुुंडे समर्थकांनी भगवान गडाच्या पायथ्याशी जमीन घेतल्याची चर्चा आहे़ त्यांनी जर मेळाव्यासाठी जमीन घेतलेली असेल तर भगवान गडावर मेळाव्या घेण्याचा अट्टहास त्यांचे कार्यकर्ते का करत आहे असा प्रश्न गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़