मारहाण करुन दागिने लंपास
By Admin | Updated: June 27, 2014 00:20 IST2014-06-27T00:05:04+5:302014-06-27T00:20:09+5:30
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील दरोड्यापाठोपाठ केडगाव येथील कांबळे मळ््यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

मारहाण करुन दागिने लंपास
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील दरोड्यापाठोपाठ केडगाव येथील कांबळे मळ््यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोघांना जखमी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. दोन दिवसांपासून प्रशासकीय तपासणीसाठी नगरमध्ये तळ ठोकून बसलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे.
केडगाव भागातील कांबळे मळ््यात बाबासाहेब कांबळे हे रात्री शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरून घरी परतले आणि घराचा दरवाजा बंद करून झोपले. गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बॅटऱ्यांचा प्रकाश तोंडावर टाकून दमदाटी केली. लाकडी दांडक्यांने सुजाता आणि बाबासाहेब कांबळे या पती-पत्नींना मारहाण केली. सुजाता आणि त्यांच्या सासुबाई कुसुमबाई कांबळे यांच्या अंगावरील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून घेतले. त्यामध्ये कानातील टॉप्स, झुबे, मिनी गंठण असे साहित्य चोरीला गेले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत सुजाता आणि बाबासाहेब कांबळे यांच्या डोक्याला मार लागला. ते जखमी असून त्यांच्यावर घरीच प्राथमिक उपचार करण्यात आले.
या प्रकरणी सुजाता कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुजाता कांबळे यांनी चोरट्यांना ओळखले होते.
परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणीच चोरटे काम करीत असल्याचे फिर्यादी सुजाता कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी गोचा मधु चव्हाण याचा मुलगा (रा. केडगाव), गणेश सुकऱ्या माळी (रा. केडगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी साथीदार अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे दरोड्याची चौकशी सुरू असल्याचे तपासी अधिकारी जाधव यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
पोलीस पाटलाच्या शेजारी चोरी
केडगाव येथील कांबळे यांच्या घराशेजारीच पोलीस पाटलांचे घर आहे. आरोपी हे कांबळे मळ्यात सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. फिर्यादीनेच त्या आरोपींना ओळखले.