सारोळ्यात जडले पुस्तकांवर प्रेम!
By Admin | Updated: December 11, 2014 00:38 IST2014-12-11T00:35:54+5:302014-12-11T00:38:01+5:30
योगेश गुंड, अहमदनगर ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे सहावीला असताना अकरावी, बारावी तसेच अन्य वरच्या दर्जाची पुस्तके वाचनाचे शाळेतील शिक्षकांनाही कौतुक वाटायचे.

सारोळ्यात जडले पुस्तकांवर प्रेम!
योगेश गुंड, अहमदनगर
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे सहावीला असताना अकरावी, बारावी तसेच अन्य वरच्या दर्जाची पुस्तके वाचनाचे शाळेतील शिक्षकांनाही कौतुक वाटायचे. गावातील कार्यक्रमांमध्ये खपली गव्हाच्या लापशीचा बेत आणि रविवारची मज्जा.... ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ या स्मरणिकेतून ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आपले मामाचे गाव सारोळा उलगडत जातात. आज त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि सारोळेकरांच्या डोळ्यासमोर ‘तो’ प्रवास पुन्हा एकदा जीवंत झाला.
सारोळा कासार (ता. नगर) हे डॉ. मोरे यांचे आजोळ. कै. गणपतराव काळे हे त्यांचे आजोबा तर प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ज्ञ डॉ. प्रतापराव काळे व प्राचार्य विश्वासराव काळे हे डॉ. मोरे यांचे मामा. डॉ. मोरे यांचा जन्म नगरमधलाच. मामाचे गाव सारोळा. यामुळे डॉ. मोरे यांचे बहुतांश बालपण व काहीसे शालेय शिक्षण सारोळ्यातच झाले. देहू या मूळ गावच्या शाळेतून डॉ. मोरे यांनी लहानपणी मामाच्या म्हणजे सारोळ्याच्या शाळेत शिकण्याचा हट्ट धरला. त्याचे कारणही तसेच. त्यांची आई हिराबाई मोरे या याच गावातील माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. मोरे यांच्या बालहट्टापायी त्यांचे नाव सारोळ्याच्या प्राथमिक शाळेत टाकण्यात आले. रोजचा रेल्वे मार्ग ओलांडून शाळेत येण्याच्या आठवणी तर मामा फक्त पाच वर्षांनी मोठे, तेही शाळेत शिकत होते. त्यावेळीच डॉ.मोरे यांचे पुस्तकांशी प्रेम जडले. शाळेतील ग्रंथालयात जाऊन पुस्तके चाळून ते तासन्तास वाचत बसत. अगदी सहावीत असताना अकरावी-बारावीची पुस्तके तसेच इतर अवांतर पुस्तके की त्यांचा विषय वरच्या दर्जाचा असायचा, अशीही पुस्तके डॉ.मोरे लहानपणापासूनच वाचून काढत. त्यांचे पुस्तकावरील प्रेम व वाचण्याचे वेड पाहून तेथील शिक्षकांना डॉ.मोरे यांच्याबद्दल कौतुक वाटायचे.
सारोळ्यातील अखंड हरिनाम सप्ताह व इतर कार्यक्रमांमधून आवर्जून केल्या जाणाऱ्या खपली गव्हाच्या लापशीचे डॉ.मोरे यांना विशेष आकर्षण. लापशीचा मेनू त्यांना खूप आवडायचा. आपल्या जडणघडणीत डॉ. मोरे यांनी मामी डॉ. मेधाताई काळे यांनीही मोलाची भर घातल्याचे आवर्जून लिहिले.
डॉ.मोरे यांनी सारोळा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या ‘स्वर्णांकित’ या स्मरणिकेत ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या लेखात आपल्या सारोळ्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या मातोश्री जेऊर, नंतर सारोळा इथे शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. डॉ.मोरे यांनी स्वत: नगरच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी केली होती.