परदेशातील नोकरी गमावली, दूध धंद्यात माणसे कमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:49+5:302021-05-01T04:19:49+5:30
राहुरी : परदेशात राहून नोकरी करीत असताना कुटुंबाला आर्थिक दृष्टीने उंचावर नेण्याचा ध्यास प्रवीण लोंढे या तरुणाने बांधला होता, ...

परदेशातील नोकरी गमावली, दूध धंद्यात माणसे कमावली
राहुरी : परदेशात राहून नोकरी करीत असताना कुटुंबाला आर्थिक दृष्टीने उंचावर नेण्याचा ध्यास प्रवीण लोंढे या तरुणाने बांधला होता, परंतु कोरोना पार्श्वभूमीने अनेकांच्या नोकऱ्यावर गदा आणली. प्रवीणचीही तीच अवस्था झाली. प्रवीणच्या नोकरीवर गदा आली. नोकरी गमावल्यामुळे मायभूमीत परत येत व्यवसाय सुरु करत माणसे कमावली.
परदेशातील नोकरी गमावल्यानंतर मायभूमीमध्ये आल्यानंतर नोकरी गेल्याने हताश न होता प्रवीण मच्छिंद्र लोंढे यांनी दूध संकलनाचा व्यवसाय सुरू केला. राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील हा तरुण सर्वांसाठी आदर्शवत काम करत आहे.
प्रवीण लोंढे हा तरुण हॉलंड येथील नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर काम करीत होता. एमबीए केलेले असल्याने लोंढे यास कंपनीने मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली होती. पूर्वीपासूनच शेती क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या प्रवीण लोंढे यांनी कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाबासकीची थाप मिळविली होती. लोंढे कुटुंबीयातील मुलगा हा परदेशात नोकरी करीत असल्याने आर्थिक प्रगतीसह गावामध्ये मोठा अभिमान होता. दरम्यान, कोरोना आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले. कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यामध्ये प्रवीण लोंढे यांनाही हॉलंड देशामध्ये कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला. अखेरीस नोकरी सोडून प्रवीण लोंढे यांनी मायभूमीत परतणे पसंत केले. घरी आल्यानंतर नोकरी गेल्याची हूरहूर होती. तर दुसरीकडे कोरोना आजारामध्ये आपल्या कुटुंबात आल्याचे समाधान होते. नोकरी गेल्याचे शल्य विसरत कुटुंबीयांमध्ये परतल्याचे समाधान मानत प्रवीण लोंढे यांनी गावातील आपली शेती बरी असे सांगत लगतच्या शेतकऱ्यांनाही लाभ होईल असे काही तरी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दूध धंद्यामध्ये शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट पाहून लोंढे यांनी गावामध्ये वडिलांच्या मयुरी दूध संकलन केंद्राला नावीन्यता देण्याचा निर्णय घेतला.
मच्छिंद्र लोंढे हे त्यांच्या दूध संकलन केंद्रात बाराशे लिटर दूध संकलन करत होते. प्रवीणची मेहनत आणि जिद्दीच्या बळावर याच दूध संकलन केंद्रात तब्बल ३ हजार ८०० लिटर दूध संकलन वाढविण्यात यश मिळाले.
तरुणांना प्रोत्साहन देत दुग्ध व्यवसाय करण्यास मार्गदर्शन करत आहे.या माध्यमातून दोन ते तीन तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर स्वतः गायी पाळत असून ८० ते ९० लिटर दूधही काढत आहे.
............
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दूध दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत असल्याने शासनाने दूध दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शासनाने दुधाला योग्य दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-प्रवीण लोंढे
.........
३० प्रविण लोंढे