झावरेंच्या दुसऱ्या पिढीची एकीची हाक
By Admin | Updated: June 2, 2016 00:57 IST2016-06-02T00:50:08+5:302016-06-02T00:57:00+5:30
पारनेर : काँगे्रस, राष्ट्रवादीची युती असली तरी काँगे्रसचे नंदकुमार झावरे व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव झावरे यांचे कधीही पटले नाही़

झावरेंच्या दुसऱ्या पिढीची एकीची हाक
पारनेर : काँगे्रस, राष्ट्रवादीची युती असली तरी काँगे्रसचे नंदकुमार झावरे व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव झावरे यांचे कधीही पटले नाही़ मात्र, त्यांच्या दुसऱ्या पिढीने घातलेली एकीची साद तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे़
तालुक्यातील ढवळपुरी येथे बुधवारी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे व जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे एकाच व्यासपीठावर येणार होते़ मात्र, हे दोघे एकत्र येणार का, याविषयीची उत्सुकता सर्वांना होती़ ते दोघेही एकाच व्यासपीठावर विराजमान झाले आणि आता पुढे दोघेही एकमेकांवर खरपूस टीका करणार, अशी अटकळ बांधली जात असतानाच सुजित झावरे यांनी राहुल झावरे यांना एकीची साद घातली़ सुजित झावरे म्हणाले, आपण दोघे एकत्र आल्याशिवाय बाजार समितीसह इतर संस्था ताब्यात येणार नाही़ त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती करावी़ त्याशिवाय तालुक्यातील इतरांना जरब बसणार नाही, अशा शब्दात एकीची हाक दिली़ युतीबाबतचा निर्णय माजी आमदार नंदकुमार झावरे हेच घेतील,असे सांगतानाच आमचे राजकारण सरळ आहे, असे सूचक वक्तव्य करायलाही राहुल झावरे विसरले नाहीत़ यावेळी सरपंच लिलाताई घोगरे, उपसरपंच बबन पवार, राजेश भनगडे, दादापाटील थोरात, भागा गावडे, बाबा खिलारी, अजित सांगळे आदी उपस्थित होते.
माजी आमदार नंदकुमार झावरे व दिवंगत वसंतराव झावरे हे कधीही एकत्र आले नाहीत़ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राहुल झावरे व सुजित झावरे यांची वाटचाल सुरु होती़ मात्र, बुधवारी दोघेही एकत्र आले अन् तालुक्यातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या़ (तालुका प्रतिनिधी)
ढवळपुरीजवळ असणाऱ्या काळू धरणास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष राहुल झावरे यांनी मांडला़ त्यास सुजित झावरे यांनी सर्वांच्यावतीने अनुमोदन दिले़ त्यामुळे या ठरावाला तालुक्याच्या राजकारणात वेगळे महत्व प्राप्त झाले असून, झावरे द्वयींची एकी तालुक्यात नव्या राजकारणाची नांदी ठरू शकेल, असे बोलले जात आहे़
दोघे बोलले मनसोक्त !
ढवळपुरी येथील कार्यक्रमानंतर सुजित झावरे व राहुल झावरे दोघांनी एकत्रित बैठकही घेतली. त्यात तालुक्यातील राजकारणावर मनसोक्त गप्पा मारत बाजार समितीच्या युतीबाबत चर्चा केली. राहुल झावरे यांनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यावर एकमत करावे, अशी सूचना मांडली तर सुजीत झावरे यांनी विरोधक आपल्यावर निवडणूक लादतील, असे सांगितले़