लोकसेवापीठ - ना. बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:11+5:302021-02-06T04:38:11+5:30

आणि यासाठीच मला बाळासाहेब थोरात यांचे यश हे नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ व मोलाचे वाटते. त्यांनी सत्तेसाठी कधीही तत्त्वांना तिलांजली दिली ...

Loksevapeeth - No. Balasaheb Thorat | लोकसेवापीठ - ना. बाळासाहेब थोरात

लोकसेवापीठ - ना. बाळासाहेब थोरात

आणि यासाठीच मला बाळासाहेब थोरात यांचे यश हे नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ व मोलाचे वाटते. त्यांनी सत्तेसाठी कधीही तत्त्वांना तिलांजली दिली नाही.

मानवी जीवनात काय किंवा राजकीय जीवनात काय, दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट संधी आणि दुसरी लायकी. संधीचे सोने करतात ते लायक ठरतात.

माणसे जन्मतः मोठी नसतात. मोठ्या माणसाच्या पोटी जन्माला येतात म्हणून ती मोठी होतात, असेही नाही. माणसाचा मोठेपणा मोठे प्रश्‍न सोडविताना,तो जे ‘गुण’ दाखवतो, त्या गुणवैशिष्ट्यात असतो.

बाळासाहेब थोरात यांचा राजकारणातला उदय मोठा नाट्यमय आहे. हे जनतेच्या उत्स्फूर्त व उदंड प्रेमातून महाराष्ट्राला लाभलेले मोठे लोभस व्यक्तिमत्त्व आहे.

१९८५ ची विधानसभा निवडणूक. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब, दोघांनीही निवडणुकांतून माघार घ्यायचे ठरविले होते, पण नियतीच्या मनात इतिहासाला नवे सुवर्णपान देण्याचा मानस होता. आपला अर्ज माघारी घेण्यात भाऊसाहेब मोठ्या कौशल्याने व चतुराईने यशस्वी झाले. पण बाळासाहेबांच्या माघारीचे दोर जनतेनेच कापून टाकले होते. कार्यकर्त्यांनी माघारीचा अर्जच बाळासाहेबांच्या हातातून हिसकावून घेतला आणि त्यानंतर ‘माघार’ हा शब्दच बाळासाहेबांसाठी हद्दपार झाला. १९८५ पासून ते आजवर त्यांची जी घोडदौड सुरू आहे, ती लोकांना थक्क करणारी आणि महाराष्ट्राला ललामभूत ठरणारी आहे.

ऐन उमेदीच्या वयात लोकांनी बाळासाहेबांवर टाकलेला विश्‍वास, त्यांनी प्रांजळ स्वभावातून आणि अथक लोकसेवेतून सिध्द केला. माणसांचा गोतावळा निर्माण केला.

भाऊसाहेबांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या विकासगंगेला महासागराचे रूप यावे म्हणून बाळासाहेबांनी कठोर तपश्‍चर्या केली. ती फळाला आलीच. शिवाय त्यातून बाळासाहेबांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. लोकसभेबरोबरच पिता-पुत्रांनी आयुष्यभर जी पक्षनिष्ठा जोपासली तीही आजच्या काळात आदर्श ठरली आहे. ‘संगमनेर’चे नाव महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या नकाशात उठून दिसावे असे विकासपर्व त्यांनी उभे केले आहे, हे मी प्रत्यक्ष त्यांच्या कार्यक्षेत्रावर पाहिले आहे.

संगमनेरमध्ये मी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने व्याख्याने दिलेली आहेत. आ. डॉ. सुधीर तांबे, मधुकर नवले,नामदेव कहांडळ आणि माझे पत्रकारमित्र नंदकुमार सुर्वे यांच्यामुळे थोरात पिता-पुत्रांचे कार्य मला जवळून अभ्यासता आले आहे. भाऊसाहेबांच्या ‘अमृतमंथन’ आणि ‘अमृतगाथा’ ह्या आत्मचरित्रांनी मी भारावून गेलो आहे. मानवतेवर माणसे हजारो व्याख्याने देतात, पण मानवतावादी कृती करणारी माणसे हजारात एक असतात आणि ती हजारो जीवांना सन्मानाने जगवत असतात.

संगमनेर सह. साखर कारखाना व अनेक सहकारी संस्था ह्या लोककल्याणाच्या वेदी आहेत. अर्थ, शिक्षण, सहकार, आरोग्य, कला अशा विविध क्षेत्रांचा सुंदर संगम तेथे पाहायला मिळतो. त्यामुळेच संगमनेर हे लोकोध्दाराचे ऊर्जापीठ झाले आहे.

भाऊसाहेबांच्या नावाला प्रतिष्ठेने जिवंत ठेवण्याचे कार्य बाळासाहेब करताहेत.

‘आमदार’ म्हणून ते चढत्या मताधिक्क्याने विजयी झालेच, पण ‘नामदार’ म्हणून ते वाढत्या श्रेणीने यशस्वी झाले आहेत.

सत्ता हे सामाजिक परिवर्तनाचे आणि प्रगतीचे साधन असते, याचे प्रगल्भ भान बाळासाहेबांना पहिल्यापासून आहे. मानवता आणि गुणवत्ता यांची जोपासना करण्यातच त्यांनी आपल्या जीवनाची सार्थकता मानली आहे. विचार आणि भावना, संकल्प आणि कार्यसिध्दी यांच्यातील एकरुपता त्यांनी प्रयत्नपूर्वक जपली आहे. निळवंडे धरणग्रस्तांचे, धरणापूर्वी पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर व मानसिक आधार देणारे बाळासाहेब..

विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटून मदतीचा हात देणारे बाळासाहेब..

महापीक योजना, शेततळी यासारख्या कित्येक उपक्रमांतून लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणारे बाळासाहेब..

उपग्रहाद्वारे भूमापन, सुवर्णजयंती राजस्व अभियान, महा- ई-सेवा इ. आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करुन प्रशासनाला गती देणारे बाळासाहेब ..

शासनाला लोकाभिमुख करून महसूलचे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे बाळासाहेब..

कोरोनाच्या काळात लोकांच्या निकोप आरोग्यासाठी तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरविणारे बाळासाहेब ..

बाळासाहेब हे साक्षात लोकसेवापीठ आहे.

‘मानवधर्माचे जतन’ हा या पीठाचा जीवनमंत्र आहे. तर ‘काँग्रेस पक्ष’ हे या पीठाचे भक्कम अधिष्ठान आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेसची धुरा बाळासाहेबांच्या खांद्यावर आहे. काँग्रेस हा जनतेची चळवळ म्हणून जन्माला आलेला पक्ष आहे. म. गांधी, पं.नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक प्रेरणेतून रचनात्मक कार्याचा नवा इतिहास काँग्रेसने रचला आहे. कृषीऔद्योगिक योजना, कसेल त्याची जमीन, सहकारी सेवा संघ, सत्तेचे विकेंद्रीकरण असे अनेक क्रांतिकारक कार्यक्रम काँग्रेसने राबवले. साहित्य, शिक्षण ,विज्ञान ,संशोधन, संस्कृती ,कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत प्रगतीचा इतिहास निर्माण केला, पण सध्या हा सारा इतिहास आम्ही विसरत चाललो आहोत. ‘अच्छे दिन’च्या भ्रामक घोषणा देणाऱ्यांच्या हाती सत्ता सोपवून आम्ही इतिहासाच्या विस्मरणाची शिक्षा भोगतो आहोत. वाढत्या धर्मद्वेषामुळे संकुचित आणि सांप्रदायिक विचारसरणीच्या मंडळींनी लोकशाहीचा मनोराच उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. आणि अशा चित्रविचित्र काळात बाळासाहेबांकडे समाजमन सांधण्याची आणि धर्मनिरपेक्षता जपण्याची मोठी जबाबदारी आहे.

बाळासाहेब हे मृदूभाषी आहेत. त्यांना भाषेचे भान आहे. समाजाच्या स्थितीगतीची व समस्यांची जाण आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वैभवाचे दिवस पाहिले आहेत. संघर्षाचे दिवस पाहिले आहेत. वादवादळे पाहिली आहेत, पचविली आहेत. पक्षाच्या पडत्या काळात सत्तेच्या मोहापोटी ते विचलित झाले नाहीत..राजकीय स्वार्थासाठी नतभ्रष्ट झाले नाहीत. काँग्रेस पक्षाचे घरटे सोडून कोठे गेले नाहीत. अन्यथा वारे बघून घरटे बदलणाऱ्यांची आणि सोईनुसार घरोबा करणाऱ्यांची मोठी परंपरा मोठ्या घराण्यांनी निर्माण केल्याचे आपण पाहतोच आहोत. आणि त्यांच्या पदरी निराशा पडल्याचे सत्यही अनुभवतो आहेत. स्वार्थांध मंडळींना इतिहासाचे, पक्षाचे आणि विचारसरणीचे काही देणेघेणे नसते. त्यांचे नाते फक्त सत्तेशी असते.

पण जी मंडळी संकटकाळात, वादळवाऱ्यात पाखरांसारखी उडून न जाता घट्टपणे, अढळपणे, प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाबरोबर राहिली, त्यात बाळासाहेब थोरात यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा वारसा बाळासाहेबांना भाऊसाहेबांकडून वारसाहक्काने लाभला आहे.

सर्वसामान्य जनता कोणत्याही एका पक्षाला बांधलेली नसते. याशिवाय पक्षात जेवढे लोक असतात त्याच्या कितीतरी अधिकपटीने पक्षांच्या बाहेर असतात. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, ‘आपला पक्ष चांगला आहे, योग्य आहे? हे सांगण्याची जबाबदारी त्या पक्षावर असते .जो पक्ष हे करतो तो राजकारण्यामध्ये यशस्वी होतो' यासाठी पक्षनेतृत्वाला लोककल्याणाचे धोरण ठरवावे लागते आणि ते राबविण्यासाठी कार्यक्रम द्यावे लागतात.

बाळासाहेबांच्या गळ्यात महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पडली तेव्हा मागील 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीतील दारुण पराभवामुळे पक्षाची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी पक्षाची अवस्था तर बिछान्यावर गर्भगळीत होऊन पडलेल्या आजारी माणसाला पळण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावण्याइतकी कठीण होती. पण हे आव्हान बाळासाहेबांनी स्विकारले. आपल्या संघटना कुशाल आणि स्नेहशील स्वभावानुसार त्यांनी पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणले. त्यांच्यातील जिंकण्याची जिद्द जागविली. शेवटी सेनापतीच्या शब्दावर सैन्य लढते आणि त्याच्यांच आत्मविश्‍वासावर युध्द जिंकले जाते. अत्यंत प्रसन्न आणि सकारात्मक वृत्तीने माध्यमांना आणि जनतेला सामोरे जाताना त्यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा जनमानसात रुजविली. भिन्न भिन्न विचारसरणीतील संघर्षामुळे एकूणच राष्ट्रीय जीवनावर सावट आले होते. प्रतिगामी विचारधारांच्या संघर्षातून नवे प्रश्‍न निर्माण झाले होते व आहेत. पुराणाभिमान जागृत करणारा सांप्रदायवाद हा एकतेला बाधक ठरत होता. अशावेळी धर्मनिरपेक्षता व समाजवादाचा विचार जपणार्‍या शरद पवार साहेबांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ बरोबर सन्माननीय तडजोड करुन बाळासाहेबांनी निवडणूकीत बाजी मारली. निदान पक्षाची संभाव्य नाचक्की टाळली. आजही सर्वांना बरोबर घेवून जाताना आणि सर्वांबरोबर राहताना आपल्या वैचारिक भूमिकेवर ते ठाम असतात. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाला अनेक कार्यक्रम दिले. पक्ष आपला आहे, आपल्यासाठी आहे. ही आपुलकीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली.

कोणत्याही नेत्याची जनमाणसातील उंची मोजण्यासाठी पंचसूत्री असते. संघटन कौशल्य, निर्णयक्षमता, रचनात्मक कार्य, कार्यतत्परता आणि लोकमान्यता ..

या पंचसूत्रातील प्रत्येक तत्व बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात उठून दिसते.

जनता ही अनेक पक्षात विखुरलेली असते. प्रलोभनामुळे ती भुललेली असते. लबाड कोल्ह्याची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. विहिरीचे पाणी गोड आहे असे सांगून बिचार्‍या शेळीला आपल्याकडे ओढून तिचा जीव धोक्यात घालणारा आणि आपला कुटील डाव साधणारा कोल्हा हा धुर्तपणाचा नमुना आहे. अशावेळी वास्तवाची जाणीव आणि भविष्याची हमी देणारा नेता भेटावा लागतो. बाळासाहेबांच्या रुपाने तो लाभला हे आपले सदभाग्य आहे.

सामान्य माणसाला दिलासा आणि धीर देणारा जीवाभावाचा लोकसखा म्हणून बाळासाहेबांकडे पाहिले जाते.

मला त्यांच्याकडे ज्ञानोबा-तुकोबांची सात्विकता, शिवबाची न्याप्रियता, शाहू-फुले-आंबेडकरांची समता, यशवंतरावांची वैचारिकता आणि वसंतरावदादांची विश्‍वासत्मकता दिसते.

बाळासाहेबांकडे गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे संवेदनाशील मन आहे. त्यांच्याकडे कष्टकर्‍यांच्या,कामगारांच्या , शेतकर्‍यांच्या श्रमाला योग्य मूल्य देण्याची दानत आहे. शिक्षणक्षेत्रात नवे प्रयोग साकारण्याची आधुनिक दृष्टी आहे.

सामाजिक न्यायासाठी प्रस्थापितांशी संघर्ष करण्याची धमक आहे.

दीनदुबळ्यांना मानव्याचे हक्क मिळवून देणारे ‘मानवतेचे चंदनी हात’ आहेत.

एकूणच जनतेतून निर्माण झालेल्या या उमद्या नेतृत्वाकडे नवा इतिहास घडविण्याचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य सतत वाढते राहण्यासाठी जनतेने बाळासाहेबांस उदंड प्रेम व परमेश्‍वराने उत्तम आयुष्य द्यावे, ही शुभकामना व्यक्त करतो.

प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे,सातारा

9422606177

Web Title: Loksevapeeth - No. Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.