बिबट्याला खोलीत कोंडणे शेतकऱ्याला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:50+5:302021-08-15T04:22:50+5:30
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावात कळमजाई वस्ती असून, तेथे रेवजी हांडे हे शेतकरी कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय ...

बिबट्याला खोलीत कोंडणे शेतकऱ्याला पडले महागात
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावात कळमजाई वस्ती असून, तेथे रेवजी हांडे हे शेतकरी कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. १३) संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी सर्व शेळ्या, बकरे घराजवळ असलेल्या नेहमीच्या जनावरे बांधण्याच्या खोलीत नेऊन बांधत दरवाजा बाहेरून बंद केला. मध्यरात्री एकच्या सुमारास बिबट्याने लोखंडी दरवाजाला धडक दिल्याने तो उघडला. बिबट्या खोलीत शिरल्यानंतर त्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. इतर जनावरे ओरडू लागल्याने हांडे घराबाहेर आले. त्यांना जनावरे बांधलेल्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला, त्यांनी आत डोकावून पाहिले असता बिबट्या होता. त्यानंतर मोठ्या धाडसाने त्यांनी लोखंडी खिळा अडकवून दरवाजा बाहेरून बंद केला. मात्र, बिबट्याला खोलीत जेरबंद करणे त्यांना चांगलेच महागात पडले. जनावरे ओरडू लागल्याने हांडे यांनी खोलीत डोकावून पाहिले असता बिबट्याने इतरही जनावरांचा फडशा पाडला होता. बिबट्याने शेळ्या, बकरे अशी एकूण आठ जनावरे ठार केली.
वनविभागाला याबाबत माहिती मिळताच घारगाव वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सुजाता टेंबरे, बाळासाहेब वैराळ, अनंता काळे यांनी कळमजाई वस्ती येथे येऊन खोलीच्या बाहेर पिंजरा लावला. त्यानंतर तीन तासांनंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याला चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने वस्तीवरील इतर ग्रामस्थ जागे होऊन घराबाहेर पडले होते. खोलीचा दरवाजा लावला नसता तर बिबट्याने लोकांवर हल्ला केला असता. असे हांडे यांनी सांगत वनविभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
-----------
फोटो नेम : १४बिबट्या, संंगमनेर
ओळ : जनावरे बांधण्याच्या खोलीत शिरलेला बिबट्या.