लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:24+5:302021-07-11T04:16:24+5:30
श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम ...

लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत
श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम शिथिल करावेत, अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.
शासनाने नुकतेच लॉकडाऊन शिथिल करून २८ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. दुकान उघडण्याची वेळ बाजारपेठेच्या व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. सकाळी ७ वा. व्यापाऱ्यांना दुकाने उघडणे शक्य नाही. ९ नंतर ग्राहक खरेदीसाठी घरातून बाहेर पडतात. तर ग्रामीण भागातील छोटेमोठे दुकानदार हे दुकाने सुरू करून घरातील व शेतीतील कामाची लाइन लावून दुपारी जेवण केल्यानंतर नजीकच्या मोठ्या बाजारपेठेत तालुक्याच्या ठिकाणी माल खरेदीसाठी येतात.
सकाळी ७ वा. दुकाने उघडण्यासाठी वेळ व दुपारी ४ वा. दुकाने बंद करण्याचा आदेश यामुळे धंद्यावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच ३ ते ४ महिन्यांच्या कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक व औषधांची दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यापारी वर्ग अधिकच संकटात सापडला आहे. लॉकडाऊन शिथिल झाला, परंतु सकाळी ७ ते ४ ही वेळ गैरसोयीची आहे. तसेच शनिवार व रविवार लॉकडाऊन सक्तीचे असू नये.
...........
यांनी केली मागणी
कापड व्यापारी हरचरणसिंग चुग, स्टेशनरी व्यापारी, रमेश गुंदेचा, क्रॉकरी दुकानदार, बबलू आहुजा, सौंदर्य प्रसाधने व प्रेझेंट वस्तू विक्री करणारे राजेंद्र पवार, भांडी दुकानदार सुधीर डंबीर, नंदू अंभोरे, विजय डंबीर, सराफ व्यापारी सचिन महाले, पोपट चापानेरकर, दिलीप नागरे, हॉटेल व्यावसायिक जयंत क्षीरसागर, रमेश वैद्य, रेस्टॉरंट चालक सुनील गुप्ता यांनी नियम शिथिल करण्याची मागणी केली.
..........
उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी
शासनाने यापुढे लॉकडाऊन शिथिल करताना दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते १०च्या दरम्यान व सायंकाळी ६ ते ७ ही दुकाने बंद करण्याची वेळ ठेवावी. कमी वेळ दुकाने उघडी असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसते, दुकाने बंद करण्याची, उघडण्याची वेळ बदलली तर बाजारात व दुकानामध्ये गर्दी दिसणार नाही. कोरोनावर मात करता येईल. कोरोनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली पाहिजे. नागरिक, ग्राहकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होऊन काटेकोरपणे पालन होऊ शकते.