‘एमपीएससी’च्या परीक्षेवर लॉकडाऊनचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST2021-04-09T04:21:52+5:302021-04-09T04:21:52+5:30
अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला आहे. मात्र याच लॉकडाऊनमध्ये रविवारी, ११ ...

‘एमपीएससी’च्या परीक्षेवर लॉकडाऊनचे सावट
अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन केला आहे. मात्र याच लॉकडाऊनमध्ये रविवारी, ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. लॉकडाऊन असला तरी ही परीक्षा होणार कोरोनाच्या सावटाखाली होणार आहे. हॉल तिकीट पाहूनच घराबाहेर पडण्याची परवानगी राहणार असल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्याची कोणतीही अडचण राहणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेवर कोरोनाचे सावट आहे. शनिवारी व रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची परीक्षा वेळेत होणार का, असा प्रश्न पडला आहे. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यात १९ हजार १५२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. त्यासाठी नगर जिल्ह्यात शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयातील ६० केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पॉझिटिव्ह उमेदवार असेल तर त्याला पीईपी किट घालून परीक्षा देण्यास परवानगी असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल, अशी व्यवस्था आयोगाने केली आहे.
-------------
शनिवारी प्रवास कसा करायचा?
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार ऐन कोरोनाच्या संकटात शहरात राहून अभ्यास करीत आहेत. काही उमेदवारांची परीक्षा परजिल्ह्यात आहे. ग्रामीण भागातून काही उमेदवार नगर शहरातील केंद्रावर परीक्षा देणार आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून नगरला, नगर येथून बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या उमेवारांना प्रवास कसा करायचा? असा प्रश्न पडला आहे. कारण शनिवार व रविवारी अशा दोन्ही दिवशी लॉकडाऊन असणार आहे.
-------------
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे पुण्यात निधन झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा धक्का बसला आहे. त्यातच काही विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली आहे, तर काही विद्यार्थ्यांच्या घरातील इतर सदस्य कोरोनाबाधित आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत काही विद्यार्थी मागणी करीत आहे. तर, काही विद्यार्थी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा व्हावी, यासाठी आग्रह करीत आहेत. कोरोनामुळे परीक्षा देण्याची कोणाचीच मानसकिता राहिलेली नाही. त्यामुळे किमान महिनाभर परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे होते.
-प्रतीक हिंगडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
-------------
काही उमेदवारांना त्यांचे पालक परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी जातील. गर्दीमुळे पालकांना परीक्षा केंद्रावर जाता येणार नाही. लॉकडाऊनमुळे उमेदवारांच्या पालकांनाही परीक्षेच्या कालावधीपुरते बाहेर पडण्यास परवानगी दिली जावी. याबाबतची कागदपत्रे जवळ बाळगली तर पोलिसांनी पालकांना अडवू नये, एवढी दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.
-प्रा. अरविंद शिंदे, पालक
-----------------
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलेली हॉल तिकीट हाच त्यांना लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्याचा पास म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यांच्या पालकांनी शक्यतो परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मात्र परीक्षा केंद्रावर उमेदवारांना वाहनाने सोडावयाचे असेल तर सदर उमेदवाराच्या हॉल तिकीट आणि आधार कार्डची झरॉक्स प्रत जवळ बाळगावी. याबाबत त्यांना पोलीस सहकार्य करतील.
-माधुरी आंधळे, तहसीलदार, महसूल प्रशासन
------------