वडगाव दर्या येथील माकडांना लॉकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:19+5:302021-05-17T04:19:19+5:30
पारनेर : कोरोना महामारीचा फटका माणसांबरोबरच वन्यप्राण्यांना बसत आहे. पारनेर तालुक्यातील जागतिक लवणस्तंभ असणाऱ्या वडगाव दर्या, वेसदरे येथे पर्यटक ...

वडगाव दर्या येथील माकडांना लॉकडाऊनचा फटका
पारनेर : कोरोना महामारीचा फटका माणसांबरोबरच वन्यप्राण्यांना बसत आहे. पारनेर तालुक्यातील जागतिक लवणस्तंभ असणाऱ्या वडगाव दर्या, वेसदरे येथे पर्यटक येणे बंद असल्याने माकडांची उपासमार होत आहे. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून देवस्थान, ग्रामस्थ, सामाजिक मंडळे त्यांना खाद्यपदार्थ देत आहेत.
वडगाव दर्या येथे दर्याबाई मंदिरात डोंगरात पाण्याने तयार झालेले लवणस्तंभ आहेत. याची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. येथे निसर्गाच्या सानिध्यात अनेक माकडांचा निवास आहे. जागतिक पर्यटनस्थळ असल्याने अनेक पर्यटक येथे येत असतात. माकडांची संख्या जास्त असल्याने पर्यटक, भाविक येताना खाद्य घेऊन येऊन माकडांना देत असत. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्याने वडगाव दर्या येथेही पर्यटक, भाविक येत नाही. त्यामुळे माकडांची उपासमार होत आहे.
शनिवारी तिथे गेल्यावर मंदिर परिसरात माकडेच दिसली नाहीत. दिवसभर माकडे दुसरीकडे असतात, असे तेथील दर्या पारधी यांनी सांगितले. देवस्थान, ग्रामस्थ, दानशूर व्यक्तीच्या वतीने खोली भरून केळी, कलिंगड, धान्य आणल्याचे देवीचे भक्त मारुती रेपाळे यांनी सांगितले. काही माकडे गोसावी बाबामंदिर परिसरात, काही वेसदरे येथे असल्याचे तेथील युवक जनार्दन परांडे, अजय आंग्रे, विकास साळवे, अनिकेत परांडे यांनी सांगितले. सध्या पर्यटक येत नसल्याने माकडे भटकंती करीत असल्याचे युवकांनी सांगितले.
----
युवकांच्या वतीने केळी, खाद्यपदार्थ वाटप
वडगाव दर्या, वेसदरे येथील माकडांसाठी पारनेर येथील नागेश्वर मित्रमंडळाचे वैभव बडवे, कल्याण थोरात, अश्विन कोल्हे, हर्षवर्धन औटी यांनी तेथे जाऊन केळी, खाद्यपदार्थ वाटप केले. पारनेर बाजार समितीचे मारुती रेपाळे यांनी येथील वन्यप्राण्यांना खाद्य, धान्य मिळावे म्हणून बँकेत ठेव ठेवून त्या व्याजातून ते खाद्य पुरवितात.