प्रबोधनासाठी साहित्यिकांनाच प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:21 IST2021-03-17T04:21:00+5:302021-03-17T04:21:00+5:30
अकोले : जीवघेण्या गुणवत्तेच्या स्पर्धेच्या गर्तेत जग सापडलेले असताना शैक्षणिक संस्थांमधील कार्यात मात्र साहित्यिकांचे मोल कमी केले जात आहे. ...

प्रबोधनासाठी साहित्यिकांनाच प्राधान्य द्यावे
अकोले : जीवघेण्या गुणवत्तेच्या स्पर्धेच्या गर्तेत जग सापडलेले असताना शैक्षणिक संस्थांमधील कार्यात मात्र साहित्यिकांचे मोल कमी केले जात आहे. तोकड्या कपड्याच्या नट्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला निमंत्रित केल्या जातात ही खंत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रबोधनासाठी साहित्यिक, विचारवंत यांनाच प्राधान्यक्रमाने बोलवावे, असे मत पतित पावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या ७१व्या 'गौरव गाभारा' या पुस्तकाचे विमोचन आणि स्वागत असा कार्यक्रम अकोले येथील टाकळकर वाड्यामध्ये रविवारी सायंकाळी पार पडला. आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट संचालित दिवंगत पुरुषोत्तम टाकळकर ग्रंथालय व संशोधन केंद्र व अकोले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा प्रा. देशमुख बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सहस्त्रबुद्धे, माजी प्राचार्य शांताराम गजे, विवेक महाराज केदार हे उपस्थित होते.
पुस्तकात सामान्य माणसांचे व्यक्तिचित्रे रेखाटून त्यामध्ये डॉ सहस्त्रबुद्धे यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली आहे. असा गौरव करून देशमुख पुढे म्हणाले, एकीकडे ट्युशनचा बोलबाला सुरू आहे, तर दुसरीकडे व्रतस्थ माणसे शिक्षकाचे शिक्षकपण जपत आहेत. व्यावहारिक जीवनात साहित्याचे मूल्य शिक्षक ओळखतो. त्यामुळे घसरत असणारी जीवनमूल्ये थोपवण्याचे काम शिक्षकच करू शकतो, असा हवाला देऊन प्रत्येक पक्ष जातीपातीच्या नावावर बांधला जाणे हे दुष्टचक्र थांबण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, प्राचार्य गजे, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, शिरीष देशपांडे यांची मनोगते झाली. याचवेळेस साहित्यिक पुंडलीक गवंडी यांच्या 'हातोडा संवेदना' या पुस्तकाचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अनिल सोमणी यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत आवारी, प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रा. डी. के. वैद्य, विजय पोखरकर, विद्याचंद्र सातपुते उपस्थित होते. चंद्रशेखर हासे यांनी आभार मानले.
...