जादा बिलांबाबत रुग्णांचे म्हणणे ऐकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:57+5:302021-02-05T06:41:57+5:30
अहमदनगर : कोरोना रुग्णांच्या एक लाखांच्यापुढील आकारलेल्या अवाजवी बिलांबाबत आता संबंधित रुग्णांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यानंतरच जास्तीच्या बिलांची वसुली ...

जादा बिलांबाबत रुग्णांचे म्हणणे ऐकणार
अहमदनगर : कोरोना रुग्णांच्या एक लाखांच्यापुढील आकारलेल्या अवाजवी बिलांबाबत आता संबंधित रुग्णांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यानंतरच जास्तीच्या बिलांची वसुली करण्याबाबत अंतिम आदेश होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांनी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले होते. यामध्ये एक लाखांच्यापुढे आकारणी झालेल्या बिलांची जिल्हा समितीने तपासणी केली. त्यामध्ये नगर शहरातील १५ खासगी रुग्णालयांनी १ कोटी १३ लाख रुपये इतकी जास्तीची रक्कम वसूल केली, असे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील समितीने स्पष्ट केले होते. संबंधित रुग्णालयांनी जास्तीची रक्कम तातडीने संबंधित रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश समितीने दिला होता. मात्र ते पैसे अद्याप वसूल झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांत संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना पैसे परत करण्याचा आदेश दिला होता. तसेच वाढीव बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशासन, समिती आणि खासगी रुग्णालयांचे संचालक यांची नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत संबंधित रुग्णांचेही म्हणणे ऐकून घेण्याचा आदेश समितीला दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली. याबाबत संबंधित रुग्णांना लेखी पत्र देवून त्यांचे म्हणणे मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याबाबत निर्णय होणार आहे. यामुळे रुग्णांनाही प्रथमच आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.