लिंगायत समाजाचे धरणे
By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:26:29+5:302014-07-16T00:44:29+5:30
अहमदनगर: विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़
लिंगायत समाजाचे धरणे
अहमदनगर: विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ समाजाच्या मागण्यांबाबतची माहिती शासनास कळविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले़
लिंगायत समाज संघर्ष समितीचे समन्वयक काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले़ समाजास धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळावा, सर्व पोट जातींचा ओबीसीत समावेश करावा, महात्मा बसवेश्वरांच्या नावे महामंडळ स्थापन करावे, यासह इतर मागण्यांसाठी समितीच्या वतीने जूनमध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते़ त्यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असता आचारसंहितेनंतर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते़ मात्र लिंगायत समाजाच्या मागण्यांची दखल राज्य शासनाने घेतली नसून, समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी लिंगायत समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़
लोकसभा निवडणुकीनंतर शासनाने निर्णयांचा धडाका लावला आहे़ मंत्रालयात मंत्री मंडळाच्या बैठकाही झाल्या आहेत़ परंतु लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय झाला नाही़ त्यामुळे या समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, शासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे़समाज बांधवांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात शशिकांत गुगळे, अॅड़ डी़एस़ लोखंडे, शिवलिंग डोंगरे, संजय कोरपे, गोपीनाथ निळकंठे आदींचा सहभाग होता़ आंदोलनकर्त्यांची विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले़
(प्रतिनिधी)