पुलावर तुटून पडलेल्या तारांतून विजेचा धक्का
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:03+5:302020-12-07T04:15:03+5:30
पाथर्डी : पाथर्डी शहराजवळील तनपूरवाडी परिसरातील कल्याण-निर्मल महामार्गावरील एका पुलावर तुटून पडलेल्या तारांमधून दुचाकीवरून चालेल्या दोघांना विजेचा धक्का बसला. ...

पुलावर तुटून पडलेल्या तारांतून विजेचा धक्का
पाथर्डी : पाथर्डी शहराजवळील तनपूरवाडी परिसरातील कल्याण-निर्मल महामार्गावरील एका पुलावर तुटून पडलेल्या तारांमधून दुचाकीवरून चालेल्या दोघांना विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले.
किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित (दोघेही रा. अकोला, ता. पाथर्डी), अशी जखमींची नावे आहेत.
किरण पंडित व निवृत्ती पंडित हे दोघे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पाथर्डी येथे दुचाकीवरून येत होते. त्यावेळी कल्याण-निर्मल महामार्गावरील तनपूरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीजवाहक तारा तुटून पडल्या होत्या. तुटून पडलेल्या तारांचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी तारांमध्ये अडकली. त्यातून विद्युत प्रवाह सुरू असल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रीय महामार्गावर उच्च दाबाच्या वीजवाहक तारा पडल्या आहेत. रस्ता क्रॉस करणाऱ्या वीजवाहक तारांना संरक्षक जाळी नाही. त्यामुळे तारा रस्त्यावर पडल्यानंतर हा अपघात घडला. अपघात होऊनही बराचवेळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी फिरकले नव्हते.
फोटो ०६ पाथरडी ॲक्सिडेंट
तनपूरवाडी पुलाजवळ उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारा रस्त्यावर पडल्याने अपघात झाला.