नाटेगाव खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:20 IST2017-09-08T17:17:36+5:302017-09-08T17:20:23+5:30
कोपरगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाºया मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपी युवराज उर्फ नामदेव आनंदा कुंभार्डे यास शुक्रवारी कोपरगावच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० हजार रूपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

नाटेगाव खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
कोपरगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपी युवराज उर्फ नामदेव आनंदा कुंभार्डे यास शुक्रवारी कोपरगावच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० हजार रूपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
दोषारोपपत्रानुसार आरोपी युवराज कुंभार्डे याचे त्याच्या मयत मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. हे मयतास समजल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. दरम्यान आरोपी युवराज कुंभार्डे याने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी रात्री साडे नऊ वाजता मयतास फोन करून अंतापूर-ताहाराबादचे भाडे असल्याने रिक्षा घेऊन येण्यास सांगितले. त्यास रिक्षा घेऊन तालुक्यातील खिर्डी गणेशच्या शिवारात गोदावरी डाव्या कालव्याजवळ बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जबर दुखापत केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयतास रिक्षामध्ये टाकून नाटेगाव शिवारातील एक्स्प्रेस कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. तसेच रिक्षा मनमाड शहरात सोडून पोबारा केला.
दुस-या दिवशी मयताच्या वडिलांना रिक्षा मनमाड येथे बेवारस पडलेली असून सीटवर रक्ताचे डाग असल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आरोपी युवराज कुंभार्डे व सुनेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.वाय. के. शेख यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. शरद गुजर यांनी १७ साक्षीदार तपासले. फिर्यादी, मयताच्या मुलीचे जबाब, स्थळ पंच, जप्ती पंच, शवविच्छेदन अहवाल व तपासी अधिकाºयाचे जबाब नोंदविण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत जिल्हा न्यायाधीश शेख यांनी आरोपी युवराज कुंभार्डे यास दोषी ठरवून १० हजारांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर मयताच्या पत्नीस पुराव्याअभावी निर्दोष ठरविले.