एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:08+5:302021-05-18T04:21:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : सध्या सगळेच कोविडच्या विळख्यात सापडलेले असतानाच ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत ...

एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : सध्या सगळेच कोविडच्या विळख्यात सापडलेले असतानाच ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सध्या अनेक लोक एकत्र येऊन कोविडच्या दुसऱ्या लाटेत लोकांना जगविण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. हेच राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कोविड सेंटरमध्ये येत असलेल्या मदतीच्या ओघातून स्पष्ट होत आहे.
कोविड सेंटरमध्ये भरती झालेला रुग्ण आणि रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्याही पोटात अन्न जावे, यासाठी लोणी येथील प्रशांत संपतराव आहेर व गणपत भोसले या व्यावसायिकांनी पुढे येत लोणी परिसरातील छोट्या, मोठ्या मराठा व्यावसायिकांना एकत्रित आणून ‘मराठा उद्योजक व्हाॅटस्ॲप ग्रुप’ तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून ७१ हजार रुपये मदत निधी जमा करून तो लोणीच्या प्रवरा कोविड सेंटरसाठी सोमवारी आ. राधाकृष्ण विखे यांच्याकडे सुपुर्द केला.
पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, अंडी, विविध फळे असा प्रवरा परिसरातूनही मदतीचा ओघ या सेंटरसाठी सुरू आहे. एकाच दिवसात ३ लाख ८१ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश प्राप्त झाले. समाजातील विविध घटकांनी, संस्थानी मदतीचे हात पुढे केले आहेत. एकाच दिवसात ३ लाख ८१ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश या कोविड सेंटरसाठी जमा झाले.
.....................
कोविड विरोधातील लढाई ही सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होऊ शकेल. रुग्णांच्या मदतीसाठी धावून आलेल्या समाज घटकांचे या लढाईतील योगदान खूप महत्त्वपूर्ण असून यासाठी मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. या महामारीचे वाढत चाललेले गांभीर्य पाहता सर्वांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
-राधाकृष्ण विखे, आमदार
170521\img-20210517-wa0077.jpg
लोणी परिसरातील मराठा व्यावसायिकांनी व्हाँटस् अप ग्रुपच्या माध्यमातून ७१ हजार रूपये मदत निधी जमा करून तो लोणीच्या प्रवरा कोविड सेंटरसाठी आ.राधाकृष्ण विखे यांचेकडे सुपूर्द केला.