आईच्या हातातून मुलाला पळवून बिबट्याने केले ठार; पंधरा दिवसातील तिसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:39 IST2020-10-30T14:38:31+5:302020-10-30T14:39:28+5:30
आईच्या हातातील चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील शिरपूरच्या पानतासवाडी शिवारात घडली.

आईच्या हातातून मुलाला पळवून बिबट्याने केले ठार; पंधरा दिवसातील तिसरी घटना
तिसगाव : आईच्या हातातील चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील शिरपूरच्या पानतासवाडी शिवारात घडली.
गावातील ग्रामस्थ, तरूण, वनविभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी तब्बल अडीच तास मुलाचा शोध घेतला. घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील सटवाई दरा येथे रक्ताचे डाग आढळून आले. रात्री उशिराही शोध मोहीम सुरू होती. गेल्या पंधरा दिवसातील तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. सार्थक संजय बुधवंत (वय ४) असे मृत मुलाचे नाव आहे.
शिरपूरगावांतर्गत असलेल्या पानतासवाडी शिवारात तारकनाथवस्ती येथे संजय बुधवंत राहतात. गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सार्थकची आई त्याला घेऊन अंगणात उभी होती. त्यावेळी काही कळायचा आतच दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या हातातील मुलाला हिसकावले. आईने प्रतिकार केला. मात्र तिचा प्रतिकार तोकडा पडला. तिने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक तेथे धावले. त्यानंतर शेकडो तरुण, ग्रामस्थ, वनाधिकारी, पोलीस यांनी लाठ्याकाठ्यासह सभोवतालचा सुमारे पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. अखेर अडीच तासाच्या शोध मोहिमेनंतर सटवाई दरा येथे सार्थकच्या शरीराचे तुकडे व रक्ताचे डाग आढळून आले.
पंधरा दिवसांपूर्वी मढी परिसरात एका चिमुरडीला बिबट्याने उचलून नेले होते. तिचाही अर्धवट मृतदेहनंतर गावाजवळ आढळला होता. त्यानंतर चार ते पाच दिवसांपूर्वीच केळवंडी येथेही आठ वर्षीय मुलाला त्याच्या आजोबांजवळून बिबट्याने उचलून नेले होते. त्याचा मृतदेहही अर्धवट अवस्थेत आढळून आला होता. आता पानतासवाडीत अशीच घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.
आईने पकडून ठेवले होते बिबट्याचे शेपूट..
पोटचा गोळा बिबट्याने आपल्या हातून हिसकावल्यानंतर आईने प्रतिकार केला. तिने आरडाओरडा करत मुलाला पळवून नेणा?्या बिबट्याची शेपटी धरून ठेवली होती. मात्र तिचे प्रयत्नही तोकडे पडले. आजूबाजूचे लोक धावत आले. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्या मुलासह तेथून धूम ठोकली होती.