बकरीच्या शिकारीसाठी गेलेल्या बिबट्याचीच शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:31+5:302021-02-05T06:41:31+5:30
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, रस्तापूर शिवारात गेल्या दहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात गुरुवारी रात्री जेरबंद झाला. ...

बकरीच्या शिकारीसाठी गेलेल्या बिबट्याचीच शिकार
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा, रस्तापूर शिवारात गेल्या दहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात गुरुवारी रात्री जेरबंद झाला. वन विभागाने गट नं. ३१५ मुथा फार्म (बांबू वन) गेली आठ दिवसांपासून लावलेल्या पिंजऱ्यात ठेवलेल्या बकऱ्याच्या शिकारीच्या आशेने बिबट्या गेला आणि अलगद जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निश्वास सोडला.
चांदा, रस्तापूर, म्हाळस पिंपळगाव परिसरात शेळ्या, कुत्रे फस्त करून तसेच अनेक शेतात डरकाळी फोडून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतात पाणी देणे, इतर मशागती थांबल्या होत्या. तसेच ऊस तोडणीवर त्याचे परिणाम झाला होते. या शिवारात ऊस पिके, बांबू वन, रानडुकरे ओढ्याचे भरपूर पाणी असल्याने बिबट्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे त्याने या परिसरात चांगलाच मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग घाबरलेला होता. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिल्याने घबराट होती. त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी केली जात होती.
वनक्षेत्रपाल थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी गाडे, ढेरे, सय्यद यांनी पिंजरा लावला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याचे समोर आले. दुपारी बिबट्यासह पिंजरा नगरला पाठविण्यात आला. गुरुवारी रात्रीच बिबट्या जेरबंद झाला.
फोटो : २९ चांदा बिबट्या
चांदा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.