कोंबडीच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:14+5:302021-07-14T04:25:14+5:30
ब्राह्मणी, चेडगाव मोकळ ओहळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. अशा परिस्थितीत भीतीच्या सावटाखाली शेतकरी वर्ग रात्र दिवस ...

कोंबडीच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात
ब्राह्मणी, चेडगाव मोकळ ओहळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. अशा परिस्थितीत भीतीच्या सावटाखाली शेतकरी वर्ग रात्र दिवस शेतीत काम करतोय. राहुल भाऊसाहेब ताके यांच्या शेतात दोन दिवसापासून पिंजरा लावला होता. बिबट्या जाळ्यात सापडावा म्हणून त्यात एक कोंबडी ठेवण्यात आली. रात्री कोंबडीची शिकार मिळणार या आशेने बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि अलगद अडकला. सोमवारी (दि.१२) सकाळी ताके यांना पिंजऱ्यात बिबट्या दिसून आला. त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविली. वन विभागाच्या वाहनांसह फौजफाटा दाखल झाला. कर्मचाऱ्यांनी त्याला सावधगिरीने त्यांच्या वाहनात घालून डीग्रस येथील नर्सरीत नेले. संबंधित बिबट्या मादी असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोमवारी सकाळी वनविभागाच्या सुवर्णा रायकर, रहीम पटेल, महादेव शेळके, बबन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली. याकामी स्थानिक नागरिक राहुल ताके, किरण जाधव, विशाल ताके, दीपक लोणारी आदींनी सहकार्य केले. परिसरात आणखी दोन पिल्ले असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी सुवर्णा रायकर यांनी दिली.