बिबट्याचा तिघा जणांवर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:22+5:302021-09-17T04:26:22+5:30
अमोल विकास उणवणे (वय ३७), नितीन मुरलीधर गायकवाड (वय ३७, रा. कोल्हार बुद्रूक) व स्वामी साहेबराव जाधव (वय ३५, ...

बिबट्याचा तिघा जणांवर हल्ल्याचा प्रयत्न
अमोल विकास उणवणे (वय ३७), नितीन मुरलीधर गायकवाड (वय ३७, रा. कोल्हार बुद्रूक) व स्वामी साहेबराव जाधव (वय ३५, रा.सोनगाव, ता.राहुरी) असे बिबट्याने हल्ला केलेल्या तिघांची नावे आहेत. आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने उणवणे व गायकवाड हे एका मोटारसायकलवर (एमएच. १७, एसी. ६५७८) तर जाधव हे दुसऱ्या मोटारसायकलवर प्रवरानगर मार्गे लोणीकडे येत असताना पेरूच्या बागेजवळ दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने आगोदर उणवणे व गायकवाड यांच्यावर हल्ला केला. यात गायकवाड यांच्या पायाचा लचका तोडण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. उणवणे यांच्या पायाला बिबट्याचे पंजे व दात लागले आहेत. या सगळ्या घटनाक्रमात या दोघांनीही स्वतःला सावरत या ठिकाणाहून गाडीसह आपली सुटका केली. याच वेळी चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या पाठीमागे मागे दुसऱ्या मोटारसायकलवर असलेल्या जाधव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण जाधव यांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणाहून आपल्या मोटारसायकलचा वेग वाढवला. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले. घटनास्थळापासून काही अंतरावर आल्यानंतर या तिघांनी अनेकांना या प्रसंगाची कल्पना देत अगोदर लोणी येथील खासगी व नंतर सरकारी रुग्णालयात जात प्रथमोपचार घेतले. बुधवारी (दि.१५) दिवसभर नगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
..............
वनविभागाकडून दखल नाही
या घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लोणी बुद्रूक येथील वन्यप्राणी मित्र विकास म्हस्के यांनी माहिती दिली. दखल घेतली नाही. प्रवरा पट्ट्यात बिबट्यांचा मुक्त संचार दिवसागणीक वाढत आहे. वनविभागाला नागरिकांनी सांगूनदेखील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून पिंजरे लावण्यासंदर्भात फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. याबाबत परिसरात असंतोषाचे वातावरण आहे.