अभिकर्ता संस्थेला कायदेशीर नोटीस
By Admin | Updated: June 21, 2014 00:46 IST2014-06-20T23:28:45+5:302014-06-21T00:46:10+5:30
अहमदनगर : कुठलीही नोटीस न देता शहर बससेवा बंद करणाऱ्या प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेला महापालिकेने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
अभिकर्ता संस्थेला कायदेशीर नोटीस
अहमदनगर : कुठलीही नोटीस न देता शहर बससेवा बंद करणाऱ्या प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेला महापालिकेने कायदेशीर नोटीस बजावली आहे. बससेवा त्वरीत सुरू करावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असे या नोटीसीत नमूद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तोटा असल्याचे कारण सांगत अभिकर्ता संस्थेने दि. १८ पासून शहरात बससेवा बंद केली. करारनाम्यानुसार सेवा बंद करण्यापूर्वी तीन महिने अगोदर महापालिकेला तसे कळविणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही नोटीस न देता अभिकर्ता संस्थेने सेवा बंद केली. स्थायी समितीनेही नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारा संस्थेचा अर्ज फेटाळला होता.
प्रशासनाच्यावतीने उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी कायदेशील सल्ला घेतल्यानंतर संस्थेला शुक्रवारी कायदेशीर नोटीस बजावली. बससेवा बंद असल्याने करारनाम्याचा भंग होत आहे.
करारनाम्यातील तरतुदीनुसार रोज हजार रुपये दंडाची तरतूद आहे. बससेवा त्वरीत सुरू करावी अन्यथा तरतुदीनुसार हजार रुपये दंड आकारणी दि. १८ पासून सुरू का करू नये? असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यावर त्वरीत खुलासा करण्याचेही म्हटले आहे. महापालिकेच्या पॅनलवरील वकिलाच्या सहीने ही नोटीस अभिकर्ता संस्थेला बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांची बैठक लांबणीवर
स्थायी समितीने संस्थेला नुकसान भरपाई वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर बससेवा बंद झाली.
बससेवा बंद पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही महापौर संग्राम जगताप यानंी नगरवासियांना दिली आहे.
स्थायी समितीचे सभापती, महापौर व प्रशासनाची बैठक अजूनही झालेली नाही. आयुक्त रजेवर असल्याने ती लांबल्याचे सांगण्यात आले.
शहर बससेवा बंद पडल्यास दीडशे कर्मचाऱ्यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे ही सेवा बंद पडू देऊ नका असे साकडे प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना घातले.
कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काही वेळ निदर्शने केली. पालिकेने सेवा बंद केली नाही, संस्थेनेच सेवा बंद केली. सेवा सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिले.
फेबु्रवारी २०११ मध्ये शहरात प्रसन्ना पर्पल मोबालिटी या अभिकर्ता संस्थेने बांधा, वापरा व मालकी तत्वावर बससेवा सुरू केली. सेवा सुरू झाल्यानंतर वर्षभरातच सेवेला घरघर सुरू झाली.
तोट्याचे कारण पुढे करत आता संस्थेने सेवाच बंद केली आहे. संस्थेकडे ३६ चालक, ४८ वाहक आणि इतर असे जवळपास दीडशे कर्मचारी आहेत. सेवा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू झाली आहे. बससेवा बंद झाल्याने वृध्द, शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांचे हाल होत आहे.
सर्वसामान्य जनतेला रिक्षाचा आधार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी बससेवा सुरू राहणे गरजेचे आहे. बससेवा सुरू रहाणे हे प्रवासी, शालेय विद्यार्थी व एमआयडीसीतील कामगारांच्या हिताचे आहे. त्यामुळे महापालिकेने ही सेवा राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा असे साकडे या कर्मचाऱ्यांनी घातले. चालक-वाहकांच्या सह्या असलेले निवेदन उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना देण्यात आले.