‘त्या’ गाव पुढाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:54+5:302021-07-22T04:14:54+5:30
केडगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गाव पुढारी, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणणे, वशिल्यावर ...

‘त्या’ गाव पुढाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
केडगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गाव पुढारी, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणणे, वशिल्यावर लस देणे यासाठी दमबाजी करणे, व्हॉट्सॲपवर बदनामीकारक मजकूर पसरविणे, असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. या पुढील काळात असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला.
नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी उपलब्ध असून, नागरिकांना लसीकरण सुरळीतपणे सुरू आहे. तालुक्यात एकूण नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व एक ग्रामीण रुग्णालय, चिचोंडी पाटील येथे असून, जिल्हा परिषदमार्फत ज्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होतात, त्यानुसार ग्रामपातळीवर नियोजन करून नागरिकांना तत्काळ लस देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत करण्यात येते. आजअखेर वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उत्कृष्ट काम केले असून, लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव तसेच दमबाजी करणे, व्हॉट्सॲपवर बदनामीकारक मजकूर पसरविणे, असे प्रकार घडल्याबाबतच्या तक्रारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी केल्या आहेत, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
उपलब्ध लसीचे प्रमाण मर्यादित असल्याने लसीकरण पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. तरी नागरिकांनी लसीकरणादरम्यान सहकार्य करावे, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना सहकार्य करावे. लसीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.