कुकडीचे पाणी तलावात सोडा
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-28T23:47:00+5:302014-06-29T00:28:48+5:30
जामखेड : पावसाअभावी निर्माण झालेली टंचाईस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी चौंडीच्या बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडावे व तेथून टँकरने पाणी पुरवठा करावा

कुकडीचे पाणी तलावात सोडा
जामखेड : पावसाअभावी निर्माण झालेली टंचाईस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी चौंडीच्या बंधाऱ्यात कुकडीचे पाणी सोडावे व तेथून टँकरने पाणी पुरवठा करावा, असे जामखेड येथे शनिवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत सूचित करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार राम शिंदे होते. यावेळी शिंदे म्हणाले, पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणीस्थिती नाजूक आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सध्या १९ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. आणखी तेरा टँकरची मागणी वाढली आहे. भुतवडा तलावावर टँकर भरले जात असल्याने जामखेडचा पाणीप्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे कुकडीचे पाणी चौंडीच्या बंधाऱ्यात सोडणे गरजेचे आहे. मजुरांना कामे उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही चालू आहे. परंतु यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे आवाहनही आ. शिंदे यांनी केले.
गटविकास अधिकारी सत्यवान चव्हाण यांनी तालुक्यातील टंचाईस्थितीचा आढावा घेतला. भिमराव लेंडे यांनी ‘महावितरण’ व तलावावरील पाणी राखून ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. यावर तहसीलदार प्रदीप कुलकर्णी यांनी यावर नियंत्रणासाठी पथक स्थापन केल्याचे सांगितले. बैठकीस सभापती डॉ. भगवान मुरुमकर, उपसभापती दीपक पाटील, पं.स. मनोज राजगुरू, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, अधिकारी, पदाधिकारी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)