पाणी योजनेला नव्हे, मनपाच्या नियोजनातच गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:57+5:302021-03-24T04:18:57+5:30
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे चांगलेच मनावर घेतले आहे. सभापती घुले ...

पाणी योजनेला नव्हे, मनपाच्या नियोजनातच गळती
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे चांगलेच मनावर घेतले आहे. सभापती घुले यांनी मुळा धरण ते वसंत टेकडी या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली, तसेच ठिकठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या नोंदी घेतल्या गेल्या. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या घेण्यात आल्या. उपलब्ध पाण्याच्या आधारे आता पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे.
मुळा धरणात मुबलक पाणीसाठा आहे; पण शहरात मात्र कायमच पाण्याची बोंब असते. त्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेण्याचा हा मनपाचा पहिलाच प्रयत्न. सभापती घुले यांच्यासह आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक निखिल वारे हे चारचाकी वाहनातून मुळा धरणाकडे निघाले. महापालिकेच्या औरंगाबाद महामार्गावरील प्रशासकीय इमारतीतून वाहनांचा ताफा नगर-मनमाड महामार्गाने मुळा धरण परिसरात पोहोचला. मनपाच्या पंपिंग स्टेशनकडे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहने पंपिंग स्टेशनसमोर येऊन थांबली. हा लवाजमा पाहून तेथे उपस्थित असलेले कर्मचारीही भारावून गेले. अनेक दिवसांनंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जवळच पाणी उपशाचे मोजमाप फारुक शेख मीटरद्वारे करीत होते. खड्ड्यात उभे राहूनच त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सभापती घुले यांनी किती पंपाद्वारे किती पाणी उपसा होतो, असा प्रश्न केला. त्यावर जल अभियंता परिमल निकम म्हणाले, मुळा धरणातून पाणी उपसा करण्यासाठी ७२५ अश्वशक्तीचे दोन व ४०० अश्वशक्तीचा एक, असे तीन पंप सध्या सुरू आहेत. हे पंप ९९ एमएलडी पाणी धरणातून उपसतात.
पाणीपुरवठा विभाग तर ७३ एमएलडीचाच उपसा होत असल्याचे सांगतो, या घुले यांच्या प्रश्नावर अधिकारीही निरुत्तर झाले. धरणातून नेमके पाणी किती उपसले जाते, याचा प्रथमच उलगडा झाला. सर्वांनी पंपहाऊसची पाहणी करीत कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तेथून वाहनांचा ताफा विळदकडे निघाला. तिथे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रात पाण्यावर प्रक्रिया होते. तेथून ११०० व ८१३, एमएम व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराकडे सोडले जाते. मुळा धरणाकडून येणारे किती पाणी विळदपर्यंत पोहोचते, याचे मीटरद्वारे मोजमाप घेतले गेले. मुळा धरणातून उपसल्या जाणाऱ्या ९९ एमएलडीपैकी ९५ एमलडी पाणी विळद जलशुद्धीकरण केंदात पोहोचते. म्हणजे मुळा धरण ते विळददरम्यान ४ एमएलडी इतकी तूट असल्याचे यातून समोर आले. या मार्गावरील किती गावांना पाणी दिले जाते, अशी विचारणा केली असता देहरे, शिंगवे, विळद या तीन गावांना मुख्य जलवाहिनीतून २४ तास पाणी दिले जात असल्याचे सांगण्यात आले. विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे आल्यानंतर तिथे आयुक्त गोरे, सभापती घुले, नगरसेवक भोसले, वारे यांच्यात चर्चा झाली. चर्चा सुरू असतानाच मीटरद्वारे पाणी मोजण्याचे काम सुरू होते. विळद जलशुद्धीकरण केंद्रातून शहराकडे सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप घेतले गेले. आता वसंत टेकडी व नागापूर येथील केंद्रात पोहोचणाऱ्या पाण्याचे मोजमाप घेऊ, त्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असे वारे म्हणाले. त्यानुसार वाहनांचा ताफा नागापूर येथील केंद्रात दाखल झाला. तोपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे तेथील पाण्याचे मोजमाप घेता आले नाही. तेथून पथक वसंत टेकडी येथील पाणी उपसा केंद्रात दाखल झाले. तेथून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो. वसंत टेकडीपर्यंत किती पाणी पोहोचते, याचे मीटरद्वारे मोजमाप करण्यात आले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. वसंत टेकडी येथे ५७ एमएलडी एवढे पाणी पडत असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले. नंतर ठिकठिकाणी घेतलेल्या पाण्याच्या नोंदींवर चर्चा झाली. या चर्चेतून शहराला दररोज पाणी देऊ शकतो एवढे पाणी उपलब्ध होत असल्याचा निष्कर्ष निघाला; पण पाणी पातळी का कमी दाखवते, या प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही.
.....
असे आहे पाण्याचे ऑडिट
मुळा धरणातून उपसा- ९ कोटी ८० लाख लिटर
विळदघाटापर्यंत पोहोचणारे पाणी- ९ कोटी ९५ लाख लिटर
विळदघाटातून नागापूरच्या लाइनला सोडले जाणारे पाणी- २ कोटी ९० लाख लिटर
विळदघाटातून वसंत टेकडीसाठी सोडले जाणारे पाणी- ५ कोटी ७० लाख लिटर
....
नियम काय सांगतो
शासनाच्या नियमानुसार शहरातील प्रत्येक माणसाला १३५ लिटर पाणी दररोज देणे आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या ५ लाख ५० हजार इतकी आहे. त्यानुसार ७ कोटी ४२ लाख ५० हजार लिटर इतके पाणी अपेक्षित आहे. वसंत टेकडीपर्यंत ५ कोटी ७० लाख, तर नागापूरसाठी २ कोटी ९० लाख लिटर पाणी उपलब्ध होते. म्हणजे एकूण ८ कोटी ८६ लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध होते. शहराची गरज ७ कोटी ४२ लाख लिटरची आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य आहे; पण सध्या दिवसाआड म्हणजे निम्म्या नागरिकांनाच मनपा पाणीपुरवठा करीत आहे.
...................
जलमीटरला पदाधिकाऱ्यांचा विरोध
महापालिकेचे आयुक्त गोरे यांनी दररोज पाणी देण्याचा मुद्दा उपस्थित केला असता अभियंता परिमल निकम यांनी जलमीटरद्वारे पाणी दिले जावे, पाण्याची नासाडी टाळण्यासाठी जलमीटर योग्य आहे, असे सुचविले. मात्र, त्यास पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला.
.................
१० ते १२ दिवसांनी पाणी का सोडता
पाण्याची गळती कमी आहे. पुरेसे पाणी शहरासाठी मिळत असताना काही ठिकाणी दिवसाआड, तर काही भागाला तर १० ते १२ दिवसांनी पाणी का मिळते, असा प्रश्न घुले यांनी केला. पूर्वी इथे १६ कर्मचारी होते. सध्या केवळ ४ कर्मचारी आहेत. पाणी सोडण्यात विस्कळीतपणा येतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर घुले यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना निकम यांना केल्या.
....
सूचना फोटो आहे.