गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:53+5:302021-03-24T04:18:53+5:30
रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरातील मैलामिश्रित हानिकारक सांडपाणी गटारीद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मात्र, यावर ...

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन
रोहित टेके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरातील मैलामिश्रित हानिकारक सांडपाणी गटारीद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्यासाठी आजवरच्या नगर परिषदेचा कारभार हाकणारे नेते, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळेच हा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही. त्यामुळे ही मंडळी शहराच्या पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरली आहे.
कोपरगाव शहराची आजची लोकसंख्या सुमारे १ लाखावर आहे. तर घरांची संख्या ही २२ हजारांपेक्षा जास्त आहे. या सर्व घरांतून निघणारे सांडपाणी हे सरळसरळ गोदावरी नदीत सोडले जात आहे. शहराची लोकसंख्या ही गेल्या काही वर्षांत वाढली आहे; परंतु ज्या वेळी लोकसंख्या कमी होती. त्यावेळीदेखील या पाण्यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. भविष्यातील वाढती लोकसंख्या गृहीत धरूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकास कामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र, या गटारींची कामे करताना नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना या गटारीतून सरळसरळ गोदावरी नदीत वाहून जाणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात साधा प्रश्नही कधीच पडला नाही. विशेष म्हणजे वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली; परंतु सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.
ज्या पद्धतीने शहरात विविध निधी आणून विकास कामे करून शोभा वाढविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. प्रसंगी शासनाच्या स्वच्छतेसंदर्भातील विवध योजनांत सहभागी होऊन लाखोंची पारितोषिकेदेखील मिळविली. मात्र, शहरातील दररोज लाखो लिटर सांडपाणी गोदावरी नदीत सोडून दिले आणि शहराच्या दर्शनी भागात असलेल्या गोदावरी नदीची गटार गंगा करून ठेवली. त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भातील धारिष्ट कोणीच दाखविले नाही. हीदेखील विशेष बाब आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या आजवरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना एवढ्या वर्षांत शहराचा साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. तर सांडपाण्याशी यांचा संबंध नसल्याचे म्हणता येईल.
..........
प्रदूषण नेमके थांबणार कधी?
इतक्या वर्षांनंतर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा १२५ कोटी खर्चाचा एस.टी.पी. प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर मागील वर्षीच मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्पदेखील शहरवासीयांसाठी दिवास्वप्नच रहिला नाही म्हणजे झाले. गोदावरी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी बंद कधी होणार, हे नगर परिषद प्रशासन आजही ठामपणे सांगू शकत नाही, हे तितकेच महत्त्वाचे आहे.
..........
कोपरगाव शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत सोडण्यात येते. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. मात्र, याविषयी फक्त पारावर बसूनच गप्पा रंगत राहिल्या. त्यामुळे उशिरा का होईना नगर परिषदेने यासंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावून नदीचे प्रदूषण टाळावे.
-सुशांत घोडके, स्वच्छतादूत, कोपरगाव.
....