जरे हत्याकांडाबाबत नेत्यांचे विधिमंडळात मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:15+5:302021-03-10T04:22:15+5:30

रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या, सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ...

Leaders are silent in the legislature about the murder | जरे हत्याकांडाबाबत नेत्यांचे विधिमंडळात मौन

जरे हत्याकांडाबाबत नेत्यांचे विधिमंडळात मौन

रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या, सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची ३० नोव्हेंबर रोजी गळा चिरून अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या झाली. बोठे यानेच या हत्याकांडाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. चौफेर शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. बोठे याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मयत जरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली, तसेच या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. बोठे मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे. फरार बोठेबाबत मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील सत्ताधारी अथवा विरोधी पक्षातील आमदारांनी आवाज उठविला नाही. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात मोठा हातखंड असलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या विषयावर मौन बाळगल्याचे दिसले.

---------------------------

पालकमंत्री म्हटले होते बोठेचा ठावठिकाणा लागला

नगरमध्ये १७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले होते बाळ बोठे याचा पोलिसांना ठावठिकाणा लागला आहे. लवकरच त्याला अटक होईल. त्याला अटक न करण्यासंबंधी पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. असे ते म्हणाले होते. ठावठिकाणा लागला होता तर मग बोठे कोठे लपला अन् तो पोलिसांना कसा सापडेना, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.

--------------------------

दिवसभर अटकेची चर्चा

बोठे याला परराज्यात अटक झाली, अशी मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात चर्चा होती. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्टँडिंग वाॅरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. ९ एप्रिलपर्यंत तो स्वत:हून न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्याच्या मालमत्तेवर टाच येऊ शकते.

Web Title: Leaders are silent in the legislature about the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.