...अखेर आईची अन बछड्याची झाली भेट : वनकर्मचा-यांच्या प्रयत्नांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 17:15 IST2019-04-24T17:13:25+5:302019-04-24T17:15:30+5:30
विहीरीत पडलेला बछडा, त्यानंतर त्याची सुटका, आईपासून दुरावल्यानंतर वन कर्मचा-यांनी केलेली बछड्याची देखभाल, आईची व बछड्याची भेट घडवून आणण्याचे मनापासून केलेले प्रयत्न यामुळे अखेर मादीची व बछडयाची भेट होऊ शकली.

...अखेर आईची अन बछड्याची झाली भेट : वनकर्मचा-यांच्या प्रयत्नांना यश
देवदैठण : विहीरीत पडलेला बछडा, त्यानंतर त्याची सुटका, आईपासून दुरावल्यानंतर वन कर्मचा-यांनी केलेली बछड्याची देखभाल, आईची व बछड्याची भेट घडवून आणण्याचे मनापासून केलेले प्रयत्न यामुळे अखेर मादीची व बछडयाची भेट होऊ शकली.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील कोकाटे मळ्यातील विहीरीत शनिवार (दि.२०) रोजी संध्याकाळी बिबट्याचा बछडा अन्न पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना पडला. स्थानिकांनी त्याला बादलीचा साहाय्याने पाण्याबाहेर काढून विहीरीत बादली लटकवत ठेवली होती. दुस-या दिवशी वनकर्मचारी हनुमंत रणदिवे, संदीप भासले, कचरू शेख, प्राणी मित्र कमलेश गुंजाळ यांनी बछड्याला बेलवंडी येथील रोपवाटीकेत नेऊन प्राथमिक उपचार करून त्यास दूध पाजले होते.
बछड्याची अन मादीची भेट घडवणे गरजेचे होते. जर यांची ताटातूट झाली तर बिबट्याची मादी आक्रमक होऊन ती स्थानिकांवर हल्ला करू शकते म्हणून संभाव्य धोका ओळखून बछड्याला परत विहीरी जवळ आणून आंब्याच्या बागेत बादलीत ठेवले. नगर येथील मदत केंद्राचे आकाश जाधव यांनी ट्रॅप कॅमेरा बसवला. पहिल्या दिवशी बछड्याची आई बछड्याजवळ फिरकलीच नाही पण दुस-या दिवशी (दि .२२) च्या रात्री मात्र या बछड्याची आई त्यास बादलीतून सुखरूप घेऊन गेली.