मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर
By Admin | Updated: July 20, 2014 00:22 IST2014-07-19T23:32:29+5:302014-07-20T00:22:22+5:30
पाथर्डी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने शनिवारी मेंढ्यांसह पाथर्डी तहसील कार्यालयावर सवाद्य मोर्चा नेण्यात आला.
मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर
पाथर्डी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने शनिवारी मेंढ्यांसह पाथर्डी तहसील कार्यालयावर सवाद्य मोर्चा नेण्यात आला.पोलिसांनी मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेटवर अडविला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना अडविले.
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी कार्यालय दणाणून गेले होते.
मोर्चाचे नेतृत्व भारतीय धनगर परिषद, राष्ट्रीय समाज पक्ष व धनगर समाज संघर्ष समितीने केले होते. मोर्चात भारतीय धनगर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चोरमले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, शहाजी कोरटकर, माजी नगरसेवक लक्ष्मणराव हंडाळ, राजेंद्र काळे, सुभाष हंडाळ ,श्रीधर हंडाळ, मंजाबापू हंडाळ, गोविंद दातीर, सुनील नरोटे आदींसह समाजबांधव मेंढ्यांसह सहभागी झाले होते.
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी तो गेटवरच अडविल्यानंतर सभा घेण्यात आली. यावेळी अशोक चोरमले म्हणाले, घटनेमध्ये तरतूद असतांना गेल्या ५८ वर्षापासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविले. आता समाज त्यांना या निवडणुकीत जागा दाखविन.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस शहाजी कोरटकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर लढा देत आहेत. ‘धनगर’ व ‘घनगड’ या शब्दांचा खेळ करीत शासनाने या समाजाचा वर्षानुवर्षे फायदा घेतला. येत्या १५ दिवसात शासनाने आरक्षण जाहीर न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला. मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदार एस.बी.भाटे यांना निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
धनगर समाज दिंडी
मोर्चेकऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. २१ जुलै रोजी बारामती येथे होणाऱ्या धनगर समाजाच्या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. धनगर समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, उद्योगपती भीमराव फुंदे, बाबासाहेब ढाकणे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गर्जे, मुकुंद गर्जे आदींनी पाठिंबा देत शासनविरोधी भूमिका घेतली.