लाखो भाविकांनी घेतले दर्शन
By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:41:32+5:302014-11-28T01:14:49+5:30
पारनेर : सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करीत राज्यभरातील भाविकांनी कोरठण येथील खंडोबाचे दर्शन घेतले़

लाखो भाविकांनी घेतले दर्शन
पारनेर : सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करीत राज्यभरातील भाविकांनी कोरठण येथील खंडोबाचे दर्शन घेतले़
राज्यभरातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी लाखो भाविकांची गर्दी झाली़ करवीर पीठाचे शंकराचार्यं, राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यासह अनेकांनी चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त दर्शनासाठी हजेरी लावली. व भाविकांना आर्शिवचनही दिले.
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आठवडाभर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेची बुधवारी समाप्ती झाल्यावर गुरूवारी मुख्य सोहळा झाला़ सकाळी मान्यवरांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते महाआरती झाली.
तालुक्यातील गोरेगाव येथून आलेली दिंडी भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली़ नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात आले. नेवासे येथील उद्धव महाराज नेवासेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी एक वाजता खंडोबाच्या चांदीच्या पालखीतून पालखी प्रदक्षिणा झाली़ यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावाने चांगभलं अशा जयघोषाने परिसर दुमुदुमुन गेला. दुपारी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी भाविकांना आर्शिवचन दिले.
सायंकाळी राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी खंडोबाचे दर्शन घेतले व भाविकांना आर्शिवचन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानजीभाई ठककर, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, तहसिलदार दत्ता भावले, देवस्थानचे विश्वस्त व भोंद्रेचे सरपंच बबन झावरे यांच्यासह विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या गर्दीने मंदीर परिसर गजबजला होता़ पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)