कोपरगाव तालुक्याला साडेसहा कोटींचा निधी प्राप्त
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:42+5:302020-12-05T04:37:42+5:30
कोपरगाव : जिल्हा परिषद स्तर, पंचायत समिती स्तर, ग्रामपंचायत स्तर, तसेच पाच जिल्हा परिषद सदस्य मिळून पंधराव्या वित्त आयोगातून ...

कोपरगाव तालुक्याला साडेसहा कोटींचा निधी प्राप्त
कोपरगाव : जिल्हा परिषद स्तर, पंचायत समिती स्तर, ग्रामपंचायत स्तर, तसेच पाच जिल्हा परिषद सदस्य मिळून पंधराव्या वित्त आयोगातून कोपरगाव तालुक्याला ६ कोटी ४० लाखांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे.
शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेला १० टक्के निधी, पंचायत समितीला १० टक्के निधी, तर उर्वरित ८० टक्के निधी हा थेट ग्रामपंचायत स्तरावर वर्ग करण्यात येत आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींना एकूण ४ कोटी २८ लाख इतका निधी वर्ग झाला आहे, तसेच पंचायत समितीकडे बंधित ५३ लाखांचा निधी, तर जिल्हा परिषदेकडून येणारा अबंधित खर्चाचा ५३ लाखांचा निधी, असा एकूण १ कोटी ६ लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद स्तरावरील तालुक्यातील पाच जिल्हा परिषद सदस्यांना मिळालेल्या १ कोटी ६ लाखांच्या बंधित व अबंधित निधीतून गटातील शाळांना आरओ प्लांट बसविणे, मुतारी बांधणे, शौचालय बांधणे, रस्त्यांचे मुरुमीकरण करणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कचरा संकलनासाठी घंटागाडी घेणे, हायमास्ट बसविणे यासह विविध कामे करण्यात येणार आहेत, तसेच जिल्हा परिषदेच्या अबंधित खर्चापोटी ५३ लाखांचा निधीतून तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त झालेल्या निधीतील ५० टक्के निधी हा फक्त पाणीपुरवठा व स्वच्छता, तसेच घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करण्यात येणार आहे, तर ५० टक्के निधी ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टीने नियोजन केलेल्या विविध मूलभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे, तसेच पंचायत समितीस्तरावरील ५३ लाखांचा बंधित निधी हा पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रेनवाॅटर हार्व्हेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना आरओ प्लांट बसविण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे, असा एकूण ६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
..............
कोट -
शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी हा चालू आर्थिक वर्षात खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. तशा सूचनाही प्रशासन स्तराववरून संबंधितांना दिल्या आहेत.
-सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव