कोपरगावात पोलीस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:31+5:302021-04-01T04:21:31+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच नागरिकांसह व्यावसायिकांकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत ...

कोपरगावात पोलीस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर
कोपरगाव : शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच नागरिकांसह व्यावसायिकांकडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने मंगळवारी (दि. ३०) शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी कोपरगाव शहरात फिरून बेशिस्त नागरिकांसह व्यावसायिकांवर कारवाई केली.
या कारवाई दरम्यान उपअधीक्षक सातव यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वासुदेव देसले यांना बरोबर घेत फौजफाट्यासह शहरातील गांधी नगर, छत्रपती संभाजी महाराज चौक, संजय नगर, सुभाष नगर, बसस्थानक परिसर या मार्गे आपल्या फौजफाट्यासह पायी जाऊन विनामास्क, दुचाकीवर टिबल सीट, विनानंबर असलेल्या वाहनांवर प्रवास करणाऱ्या अशा १०८ जणांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे २२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच रात्री आठनंतर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे, सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरेश देशमुख, शिर्डीच्या क्यूआरटी पथकासह शिर्डी व कोपरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.............
कोपरगाव शहरात गर्दी वाढत असून, नियमांचे पालन होत नाही. या संदर्भात मला काही फोन आले होते. त्या अनुषंगाने कोपरगावात येऊन ही कारवाई केली आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे.
- संजय सातव, उपअधीक्षक, शिर्डी.