बुद्धिमत्ता आणि आवड ओळखूनच शाखा निवडा
By Admin | Updated: June 10, 2016 23:39 IST2016-06-10T23:35:54+5:302016-06-10T23:39:20+5:30
अहमदनगर : इयत्ता दहावी आणि बारावीतील बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांना ९० टक्केहून अधिक गुण मिळत होते़ मात्र अलीकडच्या काळात ९० गुण अॅव्हरेज वाटतात़

बुद्धिमत्ता आणि आवड ओळखूनच शाखा निवडा
अहमदनगर : इयत्ता दहावी आणि बारावीतील बोटावर मोजण्याइतक्याच विद्यार्थ्यांना ९० टक्केहून अधिक गुण मिळत होते़ मात्र अलीकडच्या काळात ९० गुण अॅव्हरेज वाटतात़ अधिक गुण मिळाल्याने अमूक शाखेतच प्रवेश घे, असा आग्रह न धरता बुद्धिमत्ता व आवड ओळखूनच शाखा निवडणे योग्य होईल, असा सूर लोकमत आयोजित चर्चासत्रातून निघाला़
पालक, विद्यार्थी आणि प्रवेश प्रक्रिया या विषयावर लोकमत कार्यालयात शुक्रवारी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले़ चर्चासत्रास विखे फौंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ़ हरी कुदाळ, छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ आऱ एस़ देशपांडे, रायसोनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ हरिष वनकुद्रे,पाऊलबुध्दे महाविद्यालयाचे डी़ बी़ गव्हाणे, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य राजेंद्र थोरात, शासकीय तंत्रनिकेतनचे के़ एस़ शिंदे, रायसोनीचे मोहन शिरसाठ उपस्थित होते़
इयत्ता १० व १२ वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत़ पुढील प्रवेशासाठीची लगबग सुरू आहे़पण, प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे़ आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश घेऊन कोर्सेसची निवड करणे, रोजगाराच्या संधी, प्रवेश कुठे आणि कसा घ्यायचा, योग्य महाविद्यालय मिळेल का?, मिळालेच तर प्रवेश शुल्क किती असेल?,असे एक ना अनेक प्रश्न पालक- विद्यार्थ्यांसमोर आहेत़ त्यावर चर्चासत्रात सविस्तर चर्चा झाली़ विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे आहे़ या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी अभियांत्रिकी महाविद्यालयांवर असून, यंदा प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे़ चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नियमन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहेत़ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली आहे़ या प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे शिंदे यांनी दिली़ गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक प्रवेश प्रक्रिया आणि सर्वोत्तम पर्याय, असे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे़ जिल्ह्यात एकूण १३ अभियांत्रिकीची महाविद्यालये आहे़ या सर्व महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे़
या केंद्रात कागदपत्रांची छाननी करून मूळ कागदपत्रांची छाननी करण्यात येईल़ विद्यार्थ्यांना एक कोड नंबर दिला जाईल़ तो घेऊन विद्यार्थ्यांनी नगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी हजर राहणे बंधनकारक आहे़
प्रवेशासाठी चार फेऱ्या होणार असून, पहिल्या तीन फेऱ्यांसाठी आॅप्शन फॉर्म भरणे बंधनकारक आहे़ चौथ्या फेरीसाठी मात्र स्वतंत्र फार्म भरावा लागणार असल्याचे सांगण्यात आले़
अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे़ ज्या विद्यार्थ्यांचे गणित उत्तम आहे, असे विद्यार्थी अभियांत्रिकीत यशस्वी होतात़ पण, त्यांच्याकडे कल्पकता हवी असून, या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत़ त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी कोर्सेसची निवड करून प्रवेश घ्यावा़
डॉ़ हरी कुदाळ, प्राचार्य,
अभियांत्रिकी महाविद्यालय, विखे फौंडेशन
अभियांत्रिकी, आयटी आणि शासनाच्या रिसर्च सेंटरमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे़विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांची चौकशी सुरू असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी योग्य महाविद्यालयाची निवड करावी़ जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील़
डॉ़ हरिष वनकुद्रे, प्राचार्य
जी़ एज़ रायसोनी महाविद्यालय
विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत़ पण, नोकरी मिळेल की नाही, अशी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये असते़ त्यामुळे डिप्लोमा की डिग्री, असा पेच विद्यार्थ्यांसमोर असून, विद्यार्थ्यांनी योग्य अभ्यासक्रमाची निवड करावी़
मोहन शिरसाठ, प्राध्यापक, रायसोनी महाविद्यालय
शेती उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे़ अॅग्रोबेस कंपन्याही येत असून, त्या कंपन्यांत बीटेक करणाऱ्यांना मोठी संधी आहे़ त्याचबरोबर कार्पोरेट शेतीची संकल्पनाही पुढे येत आहे़ त्यामुळे अॅग्री क्षेत्रातही मोठी संधी आहे़
के़एस़ शिंदे, शासकीय तंत्रनिकेतन
अभियांत्रिकी क्षेत्रात नोकऱ्या कमी झाल्या नाहीत़ पदवी घेऊन बाहेर पडलेले अनेकजण काम करतात़ त्यांना चांगलीच नोकरी मिळते़ पण, ज्यांना काम करण्याची इच्छा नाही,असेच लोक घरी राहतात़ त्यामुळे काम करण्याची इच्छा आणि कल्पकता असल्यास या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत़
किशोर काळे, उपप्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय
सध्या यांत्रिकीकरण वाढत असल्याने पॉलिटेक्निकच्या विविध कोर्सेससाठी प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असून, ही प्रवेश पक्रिया गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक होणार आहे. विद्यार्थ्यांनी योग्य महाविद्यालयाची निवड करावी.
राजेंद्र थोरात, प्राचार्य,
श्रीसमर्थ पॉलिटेक्निक कॉलेज
नगर जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या वाढली असून, सर्वोत्तम पर्यायही विद्यार्थ्यांना याठिकाणी उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबादला न जाता जिल्ह्यातीलच महाविद्यालयांत शिक्षण घ्यावे़ शिक्षण व नोकरीसाठी येथील मुलांना जिल्ह्याबाहेर जाण्याची भविष्यात गरज राहणार नाही़ कारण सुपा औद्योगिक वसाहतीत मोठ्या नवीन कंपन्या सुरू होत आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना येथेच नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत़
डॉ़ आऱ एस़ देशपांडे, प्राचार्य, छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय
१० वी व १२ वी नंतर आयटी क्षेत्रामध्ये अनेक संधी आहे. कल्पकता असल्यास या क्षेत्रात नोकरीच्या संधी असून, विद्यार्थी व पालक यांनी या क्षेत्रातील कोर्सेससाठी योग्य महाविद्यालयाची निवड करावी.
डी.बी. गव्हाणे,
पाऊलबुद्धे महाविद्यालय
प्रवेशासाठी कोड महत्वाचा
विद्यार्थ्याने कुठल्याही महाविद्यालयातील सुविधा केंद्रात अॅप्लीकेशन रजिस्टर केल्यास त्याला तेथून एक कोड मिळतो़ हा कोड एकदाच मिळतो़ त्यामुळे कोड नंबर संभाळून ठेवणे आवश्यक असून, संपूर्ण राज्यासाठी एकच कोड आहे़ याशिवाय आॅप्शन फॉर्म भरताना महाविद्यालयाचा कोड आणि कोर्सचा कोडही असतो़ तो माहिती असणे आवश्यक आहे़ त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर मिळणारे कोड नंबर संभाळून ठेवणे तितकेच महत्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले़
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
सुविधा केंद्रात फॉर्म दाखल करणे
कागदपत्रांची छाननी करून कोड मिळविणे
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशासाठी तीन फेऱ्या
आॅप्शन फॉर्म भरणे
पहिल्या तीन फेऱ्यांसाठी आॅप्शन फॉर्म भरणे बंधनकारक
चौथ्या फेरीसाठी स्वतंत्र आॅप्शन फॉर्म भरावा लागेल