मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:19+5:302021-08-27T04:25:19+5:30
अहमदनगर : अति गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स खाण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी तीन-चार ...

मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा!
अहमदनगर : अति गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स खाण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांचेही दात किडत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. त्यामुळे लहान मुलांना गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स देण्याचे टाळावे. त्याऐवजी पालेभाज्यांचे सूप, फळांचा ज्यूस द्यावा, असा सल्ला दंतरोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
लहान मुलांना गोड पदार्थ खाण्यास आवडतात. चॉकलेट, बिस्किट यासारखे गोड पदार्थ पालकही मुलांना सर्रास देतात. हे पदार्थ चिकट असल्यामुळे त्यांचा दातांवर थर साचतो. वेळेत दात साफ न केल्यास दात किडण्याची प्रक्रिया सुरू होते. साधारणत: एक वर्षाच्या मुलांचेही दात किडलेले आढळून येतात. लहान मुलांमध्ये दात किडीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकते. मात्र, दवाखान्यांमध्ये येण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्केच असते. त्यामुळे इतर मुलांमध्ये पुढे जाऊन दातांचे वेगवेगळे आजार बळावतात. काहींना दात काढावे लागतात.
.......................
चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे !
चॉकलेट्स हे चिकट असते. ते दातांना चिकटले की त्याचा थर लवकर निघत नाही. त्यामुळे शक्यतो चॉकलेट्स खाऊच नयेत. किंवा कमी खावे. चॉकलेट्स खाल्ल्यानंतर तत्काळ दात स्वच्छ करावेत.
.................
अशी घ्या दातांची काळजी
लहान मुलांना गोड व चिकट पदार्थ खाण्यास देण्याचे टाळावे, सकाळी व संध्याकाळी दोन वेळा ब्रश करावा, दात स्वच्छ करण्यासाठी लहान मुलांसाठी बनविलेली पेस्ट वापरावी. सर्वसाधारण पेस्ट व लहान मुलांच्या पेस्टमध्ये मोठा फरक असतो. लहान मुलांच्या पेस्ट वापरल्यास दात बळकट होतात व किडीपासून संरक्षण मिळते. दर तीन महिन्यातून एकदा दंततज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
..............
लहानपणीच दातांना कीड
जास्त गोड किंवा चॉकलेट्स खाल्ल्याने लहानपणीच दात किडतात. दात किडीचे प्रमाण १ वर्षांच्या बाळापासूनही दिसून येतात. बऱ्याचदा दुधाचा दात किडला किंवा पडला तर आजूबाजूचे दात सरकू शकतात. त्यामुळे दात वाकडे उगवू शकतात. लहान मुलांमध्ये दात किडीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.
................
लहान बाळांना शक्यतो ९ महिन्यापर्यंतचे आईचे दूध पाजावे. त्यानंतर मुलांना हळूहळू खाण्याची सवय लावावी. मुलांना गोड पदार्थ देण्याऐवजी भाज्यांचे सूप, फळांचा ज्यूस द्यावा. चॉकलेट किंवा त्यासम इतर चिकटपणा असणारे पदार्थ खाण्यास देऊ नये.
-रत्ना नजान, दंततज्ज्ञ
...............
सुमारे ७० टक्के मुलांमध्ये दातांचे आजार कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. अनेकदा पालक या आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे जाऊन दात काढण्याची वेळ येते. मात्र, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास, दातांची तपासणी करून घेतल्यास दातांचे आरोग्य उत्तम राहू शकते. मुलांना दात स्वच्छ करण्यासाठी लहान मुलांचीच टूथ पेस्ट द्यावी.
-डॉ. सुहास नवगिरे, लहान मुलांचे दंत चिकित्सक