नवविवाहितेचे अपहरण; तीन आरोपींना अटक
By Admin | Updated: June 25, 2014 18:52 IST2014-06-24T23:50:55+5:302014-06-25T18:52:05+5:30
संगमनेर : संगमनेर बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या श्रीरामपूरच्या चन्या बेग टोळीतील सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी सापळा लावून अटक केली.
नवविवाहितेचे अपहरण; तीन आरोपींना अटक
संगमनेर : संगमनेर बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या श्रीरामपूरच्या चन्या बेग टोळीतील सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. अद्यापही दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
श्रीरामपूरमधील एका अल्पवयीन मुलीचा गेल्या महिन्यात जुन्नर (जि.पुणे) येथील नावेद शेख यांच्याबरोबर विवाह झाला. विवाहानंतर १५ दिवसांनी नवविवाहिता माहेरी आली होती.
माहेराहून सासरी जाण्यासाठी ती पती शेख यांच्यासोबत जीपने संगमनेरला आली. दरम्यान लघुशंकेसाठी बसस्थानकावर गेली असता पाठलागावर असलेल्या आरोपी
गोऱ्या उर्फ विजय मुन्ना जेधे, गौतम त्रिभुवन, राहुल रामेश्वर हिवाळे, चिक्या बेग व सोन्या बेग (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी तिचे अपहरण करून पळून नेले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले यांच्याकडे होता. आरोपी सराईत असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण काम होते. परंतु घटनेतील बारकावे जाणून घेत कमाले यांनी पोलीस नाईक मोरे व अविनाश शिंदे यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरविली. तपासात अपह्रत नवविवाहिता अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने आरोपींविरूध्द बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी रासकर मळा (श्रीरामपूर) परिसरात सापळा लावला. एका बांधकामाच्या स्लॅबवर आश्रय घेतलेल्या आरोपी गौतम त्रिभुवन, राहूल हिवाळे व विजय जेधे यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींना संगमनेरला आणून न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता चिक्या व सोन्या बेग या दोघा फरार आरोपी भावंडांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दोघे आरोपी सराईत असून ‘चन्या बेग’ याच्या गंठण चोरांच्या टोळीतील असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
..........
या गुन्ह्यातील फरार आरोपी चिक्या व सोन्या बेग हे दोघे कुख्यात गुन्हेगार चन्या बेग याचे सख्खे भाऊ असून या टोळीच्या नावावर गंठण चोरीचे अनेक गुन्हे आहेत.