भातोडी तलावातून खरीप आवर्तन सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:03+5:302021-09-18T04:22:03+5:30
केडगाव : भातोडी तलावातून लाभक्षेत्रातील गावांना खरीप पिकांसाठीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. भातोडी (ता. नगर) लघु पाटबंधारे ...

भातोडी तलावातून खरीप आवर्तन सुटणार
केडगाव : भातोडी तलावातून लाभक्षेत्रातील गावांना खरीप पिकांसाठीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.
भातोडी (ता. नगर) लघु पाटबंधारे तलाव सल्लागार समितीची नुकतीच ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, उपविभागीय अभियंता बबनराव वाळके, शाखाधिकारी दतात्रय मोरे आदींसह लाभक्षेत्रातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.
भातोडी तलावाच्या ऊर्ध्व भागात आगडगाव, रतडगाव, देवगाव या ठिकाणी अतिवृष्टी होऊन मेहकरी नदीला पूर आल्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. उपअभियंता बबन वाळके म्हणाले, तलावाची साठवण क्षमता १४.४२ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या तलावाखाली १२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. सध्या लाभक्षेत्रातील दशमीगव्हाण, सांडवे, मांडवे येथे कमी पावसामुळे पाणी मागणी आहे. या भागासाठी ९० हेक्टर सिंचन क्षेत्राची मागणी असून, त्यासाठी १०.८२ दलघफू इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत मेहकरी नदीला पाणी सुरू राहील तोपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.