विनाकारण फिरणा‌ऱ्यांची दंडाऐवजी केली कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:29+5:302021-04-18T04:20:29+5:30

कर्जत : शहर व उपनगरात संपूर्ण लाॅकडाऊन आहे. तरीदेखील विविध कारणे पुढे करून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या ...

Kelly Corona test instead of penalty for wandering for no reason | विनाकारण फिरणा‌ऱ्यांची दंडाऐवजी केली कोरोना टेस्ट

विनाकारण फिरणा‌ऱ्यांची दंडाऐवजी केली कोरोना टेस्ट

कर्जत : शहर व उपनगरात संपूर्ण लाॅकडाऊन आहे. तरीदेखील विविध कारणे पुढे करून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या विनाकारण फिरणाऱ्यांना शनिवारी पोलिसांनी दंड करण्याऐवजी त्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबविली. यात ३० जणांची तपासणी केली. यात एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या मोहिमेमुळे अनेकांनी घरी बसणे पसंत केले आहे.

कर्जत शहरात कोरोनामुळे शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. नगर पंचायतीचे कर्मचारी दंडात्मक कारवाई करीत आहेत. पोलीस विभाग व कर्जत नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील अनेक महाभाग विविध कारणे पुढे करून शहरात फिरत आहेत. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी अनोखी शक्कल लढविली. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन कर्जत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येकाची चौकशी करून बाहेर पडण्याचे कारण जाणून घेतले. जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत अशा ३० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. कोरोना टेस्ट सुरू झाली आहे याची माहिती मिळताच कर्जत शहर व उपनगरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी, कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

....

१७ कर्जत कोरोना टेस्ट

..

ओळ-कर्जत शहर व उपनगरात मोकाट फिरणाऱ्यांची शनिवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या मोहिमेचा अनेकांनी धसका घेतला आहे.

....

Web Title: Kelly Corona test instead of penalty for wandering for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.