परजणेंच्या विरोधात काळे - कोल्हेंचे संचालक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:45+5:302021-01-08T05:04:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ७५ पैकी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा परिषद सदस्य ...

Kale-Kolhen's director in the arena against Parjan | परजणेंच्या विरोधात काळे - कोल्हेंचे संचालक रिंगणात

परजणेंच्या विरोधात काळे - कोल्हेंचे संचालक रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ७५ पैकी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांची ग्रामपंचायत असलेल्या संवत्सरमध्ये तिरंगी लढत होत आहे. येथील १७ जागांसाठी परजणे - काळे - कोल्हे यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. विशेष म्हणजे परजणे यांच्या विरोधात काळे - कोल्हे यांनी थेट त्यांच्या कारखान्यांचे संचालक निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.

कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे चांगलेच वातावरण तापू लागले आहे. त्यातच संवत्सर ही ग्रामंपचायत स्थापनेपासून परजणे गटाच्या ताब्यात सर्वाधिक काळ राहिली आहे. गत निवडणुकीत राजेश परजणे यांना निवडणुकीत शह देण्यासाठी काळे - कोल्हे यांनी एकत्र येत निवडणूक लढविली होती. त्यावेळी राजेश परजणे यांनीच सर्वच १७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक काळे व कोल्हे यांनी सर्वच प्रभागात आपापले उमेदवार उभे करून तिरंगी लढत देत आहेत.

विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एकमध्ये गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे पुतणे तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य कृष्णराव परजणे यांचे चिरंजीव व संवत्सरचे माजी उपसरपंच, गोदावरी दूध संघाचे संचालक विवेक परजणे यांच्या विरोधात आशुतोष काळे यांचे समर्थक व कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब बारहाते तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थक व कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाची संवत्सर ग्रामपंचायतीची निवडणूक ही काळे - कोल्हे यांनी प्रतिष्ठेची तर केली नाहीना ? अशी तालुक्यात चर्चा आहे.

एकंदरीतच या निवडणुकीत परजणे गटाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांकडे मत मागत आहेत, तर दुसरीकडे गावात विकास झालाच नाही या मुद्यावर विरोधक मत मागत आहेत. मात्र, या लढाईत काय होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Kale-Kolhen's director in the arena against Parjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.