सुपा-शहाजापूर रस्त्यावरील प्रवास खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:39+5:302021-08-01T04:20:39+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा-शहाजापूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील प्रवास खडतर झाला आहे. खड्ड्यातून वाट शोधताना वाहन चालकांनाही कसरत ...

सुपा-शहाजापूर रस्त्यावरील प्रवास खडतर
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा-शहाजापूर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील प्रवास खडतर झाला आहे. खड्ड्यातून वाट शोधताना वाहन चालकांनाही कसरत करावी लागते.
सुपा गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुझलॉन पवन ऊर्जा प्रकल्पाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. कौडेश्वर देवस्थान ही प्रसिद्ध असून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हिरवागार वनराईने नटलेला परिसर, ठिकठिकाणी साठलेले पाणी, उंचावरून दिसणारा विलोभनीय परिसर, वनविभागात दिसणारे मोर, ससे, कोल्हे आदी वन्य प्राण्यांचे दर्शन घडते. त्यासाठी नगर, पुणे जिल्ह्यातून पर्यटक आवर्जून भेट देण्यासाठी येतात. तसेच अलीकडे प्रीवेडिंगचे फोटोशूट करण्यासाठी हौशी मंडळींचा वावर वाढला आहे. कधी कधी सिनेमाचे शुटींग ही या भागात होते. रस्ता खड्डेमय असल्याने यासाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. खड्ड्यात अनेकदा वाहन आदळून नुकसान झाल्याचे पर्यटक नंदकुमार साठे व निलेश ढगे यांनी सांगितले.
शहाजापूर हे डोंगरी विभागातील गाव असल्याने त्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून देऊन रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी माजी सरपंच अण्णा मोटे यांनी केली. येथील शेतकऱ्यांना दूध, फुले, भाजीपाला, फळे घेऊन सुप्याकडे याच रस्त्याने जावे लागते. तसेच इतर कामांसाठीही ग्रामस्थांना याच रस्त्याने ये-जा करावी लागते, असे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी सांगितले. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करावे, अशी मागणी सरपंच प्रमोद गवळी यांनी केली.
--
सुपा-शहाजापूर रस्त्याची येत्या एक-दोन दिवसात समक्ष पहाणी करू. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव करून मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. अंतर व इतर निकष पाहता हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होईल.
-नाना अहिरे,
उप अभियंता, जिल्हा परिषद
-----
३१ शहाजापूर
सुपा-शहाजापूर रस्त्याची झालेली दुरवस्था.