नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 15:23 IST2018-10-29T15:19:59+5:302018-10-29T15:23:09+5:30
जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर
अहमदनगर : जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिला आहे. परंतु त्यानंतर नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनास सुरूवात झाली. अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जायकवाडीस पाणी सोडल्यास आपण प्रवरा पात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला असून प्रवरा नदीवरील पुलावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे.
त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी बैठक झाली. ही सर्व स्थिती पाहता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभाग यांच्याकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.