बारामतीत घुमणार ‘जय मल्हार’
By Admin | Updated: July 10, 2014 00:36 IST2014-07-09T23:45:33+5:302014-07-10T00:36:03+5:30
अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी
बारामतीत घुमणार ‘जय मल्हार’
अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा व आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढून बारामतीत ‘जय मल्हार’चा नारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घेरण्याची व्यूहरचना आरक्षण कृती समितीने आखली आहे़ तसेच विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आरक्षणाची घोषणा न केल्यास काँगे्रस, राष्ट्रवादीच्या विरोधात थेट काम करण्याची भूमिका धनगर समाजाच्या नेत्यांनी जाहीर केली़
राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नगरमध्ये राज्यस्तरीय मेळावा बुधवारी झाला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे नेते शालीग्राम होडगर हे होते़ कृती समितीचे पदाधिकारी व नेत्यांनी आरक्षणप्रश्नी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़
कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत सूळ म्हणाले, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले़ मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते व पवार यांचाही या आरक्षणास विरोध आहे़ बारामती, इंदापूर, माढा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठे आहे़ या मतदानावरच पवारांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या़ आगामी विधानसभेत राष्ट्रवादी व आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढण्यात येणार आहे़ ही दिंडी १५ जुलैपासून सुरु होऊन २१ जुलैला बारामतीत पोहचणार आहे़ तत्पूर्वी सरकारने धनगर समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास
त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सूळ यांनी दिला़
होडगर, सुभाष खेमनर, कैलास चिंधे आदींनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली़ यावेळी दादाभाऊ चितळकर, बापूसाहेब बाचकर, निशांत दातीर, मनसेचे सचिन डफळ, वसंत लोढा, गंगाधर तमनर, नगरसेविका शारदा ढवण, दिगंबर ढवण, चंद्रकांत तागड, विठ्ठल दातीर, विजय तमनर आदी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)
राजकीय टोलेबाजी
आमदारांनी मुख्यमंत्र्यांची येथूनच दूरध्वनीवरुन चर्चेसाठी वेळ घ्यावी असे विधान कृती समितीचे अध्यक्ष सूळ यांनी केले़ हा धागा पकडून आ़ अनिल राठोड म्हणाले, राज्यात आघाडीचे सरकार आहे़ पांडुरंग अभंग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे़ त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ कशी घ्यायची? असा प्रश्न उपस्थित केला़ तर बारामतीतील पदयात्रेनंतर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास सूळ राष्ट्रवादी सोडतील का? असा प्रश्न आ़ शिवाजी कर्डिले, आ़ राम शिंदे यांनी उपस्थित केला़ सूळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, यावरुन आरक्षण हक्क परिषदेत चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली़
युतीचे सरकार सत्तेत असताना आ़ राठोड मंत्री होते़ त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभंग यांनी शरद पवारांनी कसे चांगले निर्णय घेतले याचे विश्लेषण सुरु केले़ त्याचवेळी आरक्षणावर बोला, पवारांचे सांगू नका अशी मागणी करीत उपस्थितांनी जय मल्हारच्या घोषणा देत अभंग यांना भाषण थांबविण्यास भाग पाडले़ त्यानंतर भाषणास उठलेल्या आ़ कर्डिले व आ़ शिंदे यांनीही अभंग व सूळ यांनाच लक्ष्य केले़