तुंबलेल्या गटारीत पडून इसमाचा मृत्यू, पालिकेविरूद्ध परिसरातील नागरिकांचा रोष
By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 3, 2023 15:53 IST2023-10-03T15:52:45+5:302023-10-03T15:53:09+5:30
Ahmednagar: रात्री साडेनऊच्या सुमारास हनुमान नगर येथून जाणाऱ्या सचिन गहीनाथ गजर (वय ३६, रा. सर्व्हे नंबर १०५, कोपरगाव) या तरूणाच्या गटार लक्षात आली नाही. यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तुंबलेल्या गटारीत पडून इसमाचा मृत्यू, पालिकेविरूद्ध परिसरातील नागरिकांचा रोष
- सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : सोमवारी रात्री सात वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी आणि गटारी तुंबल्या होत्या. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास हनुमान नगर येथून जाणाऱ्या सचिन गहीनाथ गजर (वय ३६, रा. सर्व्हे नंबर १०५, कोपरगाव) या तरूणाच्या गटार लक्षात आली नाही. यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी सचिन गहना गजर हा रोजंदारीवर काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी काेपरगाव शहरात मुसळधार पाऊस होत होता. रस्त्यांवर पाणी साचलेले होते. गटारी तुंबल्या होत्या. यावेळी हनुमान नगर येथून कीराणा सामान घेवून घरी जात असताना उघड्या गटारीचा अंदाज न आल्याने सचिन त्यात पडला. परिसरातील काही लोकांना गटारीत पाय दिसून आले. नागरिकांनी सचिनला तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले.
गेल्या दोन वर्षापासून हनुमान नगर येथील गटारीचे काम रखडलेले आहे. याच गटारीत पडून सचिनचा मृत्यू झाला, यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.सचिन गजर यांची परिस्थिती हालाखीची असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
मुख्याधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करा; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी
सचिन गजर यांच्या मृत्यूस पालिका प्रशासन व संबंधित कामाचा ठेकेदार जबादार असून मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते मंगळवारी दुपारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जमा झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थतीत झालेल्या बैठकीत मयत सचिन गजर यांच्या कुटूंबियांना दहा लाख रूपयांची मदत करावी व त्यांच्या पत्नीस पालिकेत नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी पराग संधान, कैलास जाधव, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तम पवार, मंगेश औताडे, जितेंद्र रणशुर, राजेंद्र सोनवणे, केशव भवर, दत्ता काले, अशोक लकारे, बबलू वाणी, सनी वाघ, असलम शेख, सोमनाथ म्हस्के, जावेद पठाण, पप्पू पठाण आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.