विखेंनी आणलेल्या रेमडेसिविर प्रकरणाचा तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:47+5:302021-05-01T04:19:47+5:30
याबाबत उपअधीक्षक मिटके यांना विचारले असता जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे सोपविला आहे. त्याच्या ...

विखेंनी आणलेल्या रेमडेसिविर प्रकरणाचा तपास सुरू
याबाबत उपअधीक्षक मिटके यांना विचारले असता जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे सोपविला आहे. त्याच्या तपासाकरिता शिर्डी विमानतळावरच आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार विखे यांनी दिल्लीवरून विमानाने दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन विनापरवानगी आणल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. विखे यांनी इंजेक्शन साठवताना काढलेले व्हिडिओ तसेच छायाचित्र खरे आहेत का? हे तपासण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली होती. विमानतळावरील फुटेज गहाळ झाले अथवा सापडत नाहीत, अशी कारणे खपवून घेणार नाही, असेही न्यायालयाने बजावले आहे.
शिर्डी विमानतळावर विखे यांनी इंजेक्शनचा साठा विशेष विमानांमधून उतरविला होता. हा साठा कोठून आणला, हे त्यांनी जाहीर केलेले नाही. साठ्यातील इंजेक्शन त्यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे रुग्णालय व राहाता येथील सरकारी रुग्णालयात नेली.
गुरुवारी न्यायालयाने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन इंजेक्शनने दिल्ली ते शिर्डी असा विमान प्रवास केला नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावर जिल्हाधिकारी हे खासदारांना पाठीशी घालत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. अजिंक्य काळे व ॲड. राजेश मेवारा हे काम पाहात आहेत.
----
जिल्हाधिकारी बाजू मांडणार
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या वतीने सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार ३ मे रोजी अडीच वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे.