प्र्रस्तावित पेरणीवर विमा काढता येणार

By Admin | Updated: June 25, 2014 00:32 IST2014-06-24T23:47:37+5:302014-06-25T00:32:56+5:30

राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजनेसाठी पेरणीची अट नाही.

Insurance can be drawn on the proposed sowing | प्र्रस्तावित पेरणीवर विमा काढता येणार

प्र्रस्तावित पेरणीवर विमा काढता येणार

राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजनेसाठी पेरणीची अट नाही. शेतकऱ्यांना प्रस्तावित पेरणीवर पीक विमा उतरविता येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. मात्र, यासाठी ३० जून अंतिम मुदत असल्याचे त्यांनी सांगितले.
कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी ही विमा योजना आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ टक्के देखील खरिपाची पेरणी झाली नसल्याने योजनेला मुदत वाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
पावसाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती यापासून शेती पिकांना संरक्षणकवच मिळावे यासाठी ही योजना आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून संरक्षण देणारी हवामानावर आधारित या पीक विमा योजनेला कृषी विभाग ही योजना राबवित आहे. या योजनेसाठी पेरणीची अट नाही. शेतकऱ्यांना प्रस्तावित पेरणीवर पीक विमा उतरविता येणार असल्याचे माने यांनी सांगितले. मात्र, यासाठी संबंधीताला शेतकरी असण्याचा पुरावा म्हणून सात बारा आणि आठ अ चा उतारा विमा प्रस्तावासोबत जोडावा लागणार आहे.
कायदा सुव्यवस्था धोक्यात
पावसाअभावी जिल्ह्यात ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना, सामान्य मानसांना रात्रीच्या वेळी चोरट्यांच्या भितीमुळे रात्र जागून काढावी लागत आहे. ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्या, घरफोड्या अशा घटनांमध्ये वाढ झाली असून त्यालाही पाऊसच कारणीभूत आहे.
पाऊस नसल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा गंभीर प्रश्न आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने पर्यायाने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात सर्वच ठिकाणी चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडताना दिसत असून यामुळे पोलिसही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुमारे तीन आठवडे पावसाला उशीर झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील मूग आणि उडिदाचे क्षेत्र घटले आहे. मात्र, त्या ठिकाणी कपाशी, सोयाबीन आणि बाजरीचे क्षेत्र वाढणार आहे. दमदार पावसानंतर बियाणे आणि खतांचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घेतलेली आहे. सोयाबीन बियाणांचा प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे. आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.
- उमाकांत दांगट, कृषी सचिव.
जिल्ह्यात पावसाअभावी कडधान्याचे क्षेत्र कमी होईल. मात्र, तूर पीक हे १५ जुलैपर्यंत घेता येईल. कडधान्या ऐवजी अन्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांनी हवामान आधारित पीक योजनेचा लाभ घ्यावा. प्रस्तावित पेरणीवर देखील पीक विमा काढता येईल.
- अंकुश माने,
जिल्हा कृषी अधीक्षक
पेरणीसोबत जिल्ह्यात उभे पिके संकाटात आलेली आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांना ठिबकव्दारे पाणी पुरवठा करावा. तसेच खरिपासाठी बीज प्रक्रिया करून बसेल खतांची मात्र द्यावी. कडधान्याऐवजी अन्य पिके घ्यावीत. गादी वाफ्यांवर पेरणी करावी.
- विलास नलगे,
जिल्हा कृषी अधिकारी.
जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. ग्रामीण भागात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लवकरच पाऊस पडेल. त्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता पडून देणार नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सर्व सहकार्य करणार आहे.
- विठ्ठलराव लंघे, अध्यक्ष,
जिल्हा परिषद.
जिल्हा परिषदेचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज आहे. आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा असून लवकर पाऊस व्हावा, अशी अपेक्षा आहे. कृषी विभागाने हंगामाचे पूर्ण नियोजन केलेले आहे.
- बाबासाहेब तांबे, सभापती,
कृषी आणि पशुसंवर्धन विभाग.
पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे भरले अन् नैसर्गिक आपत्तीत त्याचे पीक गेले तर नुकसान भरपाई मिळते, असा शासनाचा सध्याचा नियम आहे. पावसाअभावी पेरण्या झाल्या नाही तरी शासनाने १ ते ७ जूनच्या दरम्यान पीकविम्याचे पैसे भरून नुकसान भरपाई द्यावी. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या मागणीसाठी आग्रही आहोत. व्यापाऱ्यांनी बियाणे, खतांचा काळाबाजार करू नये, तसे झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल.
- प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना
शासन शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठिशी आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक १०० कोटींचा पीक विमा नगर जिल्ह्याला मिळाला. जिल्हा बँकेमार्फत खरीप, रब्बी पिकासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचे हप्ते बँकच भरते व जेथे ५० टक्क््यांच्या खाली आणेवारी असेल त्यांना भरपाई दिली जाते. शिवाय सरकारने यंदा खरिपाची मुबलक खते व बियाणे उपलब्ध करून दिले आहे. कुठेही त्याची टंचाई नाही. त्यामुळे काळाबाजार होणार नाही. तसा काही प्रकार आढळला तर त्वरित कारवाई केली जाईल.
- पांडुरंग अभंग,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
पावसाअभावी नगरच्या बाजारपेठेत सुमारे १५ ते २० कोटींचे खते आणि बियाणे पडून आहे. कांदा आणि कपाशी बियाणे संबंधीत कंपन्यांनी परत न घेण्याच्या मागणीवर दिलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी अधिक हवालदिल आहे. यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा जेणे करून व्यापारी आणि शेतकरी दोघांना दिलासा मिळले.
- अजय मुथा,
फर्टीलायझर संघटनेचे सचिव
धरणातील सध्याचा
पाणीसाठा टक्केवारीत
मुळा १९.८५, भंडारदरा ९, निळवंडे १०.५२, आढळा १५.४७, मोडओहळ २०.३१, घाटशिरस शून्य, घोड २८.४३, खैरी ७.४४, सीना १०.१३ असा आहे.

Web Title: Insurance can be drawn on the proposed sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.