सामाजिक-शैक्षणिक चळवळीतील प्रेरणा : रामनाथ वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:16+5:302021-08-01T04:20:16+5:30
--------------- रामनाथ वाघ यांचा आणि आमच्या गेल्या तीन पिढ्यांचा काैटुंबिक संबंध आहे. वडील भाऊसाहेब झावरे प्राथमिक शिक्षकांचे पुढारी होते. ...

सामाजिक-शैक्षणिक चळवळीतील प्रेरणा : रामनाथ वाघ
---------------
रामनाथ वाघ यांचा आणि आमच्या गेल्या तीन पिढ्यांचा काैटुंबिक संबंध आहे. वडील भाऊसाहेब झावरे प्राथमिक शिक्षकांचे पुढारी होते. त्यावेळी पांडुरंग फलके गुरुजी, काकासाहेब म्हस्के यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध. पुढे १९७२ मध्ये अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी मी नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढे लाॅ काॅलेजला प्रवेश घेतला. अण्णांची व माझी ओळख खासदार चंद्रभान आठरे यांच्या घरी झाली. अण्णांमधला प्रयत्नवादी गुण आम्हाला भावला. त्यांची चाणाक्ष, व्यापक व ज्ञानपूर्ण दृष्टी यामुळे जिल्हा मराठा संस्था उभारणीला गती आली. संस्थेतील शिक्षणाबरोबर त्यांनी राजकीय, कृषी क्षेत्रात भरीव काम केले. त्यांनी जिल्हा मराठा संस्थेला प्रथमच मराठा बोर्डिंगच्या रूपातून बाहेर काढले. केवळ जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून त्यांनी लौकिक मिळवून दिला. त्यांचा पिंड तसा राजकीय. १९६४ मध्ये शरद पवार यांनी त्यांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड केली. पुढे १९७२ नंतर राहुरीतील वांबोरी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे, पाझर तलाव, नाला बंडिंगची कामे केली. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला.
अण्णांनी ६० वर्षांहून अधिक काळ संस्थेसाठी योगदान दिले. संस्थेच्या शाखा वाढविताना शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी काम केले. अण्णा म्हणजे जिल्हा मराठा संस्थेचा सामाजिक चेहरा होते. जीवनाला सतत प्रवाही ठेवल्यामुळे त्यांच्या जगण्याचा परीस सतत परिवर्तनीय ठरत गेला. अध्यक्ष या नात्याने त्यांच्याच प्रेरणेने संस्था पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अण्णांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
- नंदकुमार झावरे, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज