अंतर्गत वादाने नगरचे ‘आप’ अस्वस्थ
By Admin | Updated: June 9, 2014 00:04 IST2014-06-08T23:50:30+5:302014-06-09T00:04:17+5:30
अहमदनगर: सर्वसामान्यांना सत्तेची स्वप्नं दाखविणाऱ्या आम आदमी पक्षाचा फुगा लोकसभा निवडणुकीत फुटला़ निवडणुकीनंतर प्रमुख नेत्यांत चांगली जुंपली.

अंतर्गत वादाने नगरचे ‘आप’ अस्वस्थ
अहमदनगर: सर्वसामान्यांना सत्तेची स्वप्नं दाखविणाऱ्या आम आदमी पक्षाचा फुगा लोकसभा निवडणुकीत फुटला़ निवडणुकीनंतर प्रमुख नेत्यांत चांगली जुंपली असून, ऐन विधानसभेच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे पक्षाचे संघटन तर दूरच पण नगर शहरासह जिल्ह्यातून पक्ष बेदखल होतो की काय, या चिंतेने कार्यकर्त्यांना ग्रासले आहे़
सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आम आदमी पक्ष समोर आला़ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने प्रस्थापितांचा सफाया केला़ सर्वसामान्यांनी आपला आपले मानले आणि त्यांच्या झोळीत भरभरून मते टाकली़ आपने दिल्ली सर केली़ या विजयाने आपचे नेते हुरुळून गेले़ त्यांना लोकसभेचे डोहाळे लागले़ दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली़ परंतु दिल्लीत मिळविलेला विश्वास आपने लोकसभेच्या निवडणुकीत गमावला़ काही मतदारसंघात तर आपच्या नेत्यांना दगड झेलावे लागले़ निवडणुकीनंतर पक्ष सावरेल, अशी अपेक्षा होती़
मात्र पुन्हा पक्षात राजीनामा नाट्य सुरू झाले़ त्यामुळे पक्षाचे हासू झाले़ कुणाचाच पायपोस कुणात राहिला नाही़ अशीच काही स्थिती नगरमध्येही पहायला मिळत आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असतानाच आप मध्ये मात्र थंडाथंडा कुल कुल, असे वातावरण आहे़ कार्यकर्ते कोण आणि कुठे आहे,याचा थांग पत्ता नाही़
लोकसभा निवडणुकीत आपकडे युवक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती़ परंतु दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा पराभव झाला़ त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला भविष्य नाही,असे कार्यकर्त्यांचे मत झाले आहे़ त्यात वरिष्ठ पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे़ त्यामुळे नवीन कार्यकर्ते जोडले जातील, असे वाटत नाही़ पक्ष संघटना बळकट करून दिग्गजांना आव्हान देऊ शकेल,असा चेहरा नाही़ पक्ष स्थापनेपासून असा एकही कार्यकर्ता पक्षाच्या गळाला लागला नाही़ याशिवाय पक्षाची इतर राजकीय नेत्यांनी दखल घ्यावी, असे काही घडताना दिसत नाही़
विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटेल, असा विश्वास पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आहे़ परंतु प्रत्यक्षात त्यासाठी प्रयत्न होत नसून, पक्षापासून कार्यकर्तेही दुरावत चालले आहेत़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आप कुठे असेल, याबाबत उत्सुकता आहे़ (प्रतिनिधी)
पक्षात सर्वकाही ठिक आहे़ कार्यकर्तेही काम करत आहेत़ विधानसभा निवडणुकीबाबत पुढील महिन्यात निर्णय होणार आहे़ त्यानुसार निवडणूक लढविली जाणार असून, उमेदवारही निश्चित होतील़
- किरण उपकरे, आप